परभणी - शहरातील काही मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध नसल्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या अपंगांची कुचंबणा झाली. नातेवाईक अपंगांना खुर्चीवर बसवून, उचलून मतदान केंद्रात घेवून जात होते. या परिस्थितीकडे निवडणूक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मतदारांतून संताप व्यक्त केला गेला.
परभणी शहरात विविध शाळा, महाविद्यालय आणि शासकीय कार्यालयांमधून विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. परंतु, यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर अपंगांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. निवडणूक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर अपंगांना मतदानाच्या टेबलपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र या मतदान केंद्रावर व्हीलचेअरच उपलब्ध नव्हती. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या अपंगांना त्यांचे नातेवाईक खुर्चीवर बसून किंवा हातात उचलून मतदान खोलीत घेऊन जाण्याची वेळ आली.
विद्यानगर जवळील बाल विद्यामंदिर या शाळेच्या मतदान केंद्रात अशी स्थिती आढळून आली. या मतदान केंद्रात मतदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मात्र, परिसरातून येणाऱ्या अपंगांना व्हीलचेअर उपलब्ध नव्हती. नातेवाईकांच्या सहकार्याने त्यांना मतदानासाठी केंद्रात पोहोचावे लागले. पायाने अपंग असलेले मतदार कसरत करत मतदान केंद्रात येत होते. अशीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर होती.