परभणी - नेहमीप्रमाणे यंदाही परभणीत उष्णतेचा कहर होत आहे. गेल्या महिनाभरापासून 40 अंशांवर राहणाऱ्या तापमानाने आज 44.5 अंशाचा पल्ला गाठला आहे. विशेष म्हणजे ही उष्णतेची लाट येत्या तीन दिवसांत आणखी वाढणार असल्याने परभणीकर हवालदिल झाले आहेत. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. ज्यामुळे गजबजलेले रस्तेदेखील निर्मनुष्य झाल्याचे दिसत आहे.
परभणी जिल्ह्यावर सध्या सूर्यनारायण अक्षरशः आग ओकत आहे. उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात आज 44.5 अंश डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. हे तापमान या मोसमातील सर्वाधिक तापमान आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील तीन दिवसात हे तापमान वाढत राहणार असून उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाड्यात औरंगाबाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती राहणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
वाढत्या तापमानामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. ताप, खोकला, सर्दी, उन्हाळी लागणे, घशाची खवखव, असे आजार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडताना डोक्याला रुमाल तर अंग भरून कपडे घालावेत आणि डोळ्याला गॉगल घालूनच निघावे. तसेच प्रचंड तापमानामुळे शरीरातील पाणी कमी होत असून ते भरून काढण्यासाठी रसयुक्त फळांचे सेवन करावे, भरपूर पाणी, लिंबू सरबत वारंवार पित राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
"रस्ते निर्मनुष्य"
वाढत्या तापमानाचा फटका परभणीतील बाजारपेठेलादेखील बसला आहे. कायम गजबजलेल्या येथील गांधी पार्क, शिवाजी चौक, सुभाष रोड, अष्टभुजा देवी चौक, शिवाजी रोड, स्टेशन रोड आदी भागातील बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. सकाळी 10 वाजेनंतर वातावरणातील उष्णता वाढत असून सायंकाळी सात वाजेपर्यंत उष्णतेच्या झळा कायम राहत आहेत. या दरम्यान सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.