परभणी - शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाची प्रक्रिया येत्या आठ दिवसात सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
परभणी जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली होती. त्या पावसात सोयाबीन आणि कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला होता. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामे करण्याचा दुराग्रह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला.
हेही वाचा - VIDEO : अन् 'तिने' शिकवला छेड काढणाऱ्यास चांगलाच धडा
या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक या आणि इतर कर्मचाऱ्यांना बेजार करण्यात आले. वास्तविक पाहता प्रशासनातील हे कर्मचारी गावगाड्याशी आणि शेतीशी सर्वांत जास्त जवळीक असणारे असतात. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या केवळ नजर पाहणी अहवालावरुनच झालेले नुकसान ठरवण्यात यायला हवे होते. मात्र, तसे न करता जिल्हा प्रशासनाने वेळ काढू धोरण अवलंबले, असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
शेतांचे पंचनामे पूर्ण होऊन बरेच दिवस उलटले आहेत, मात्र अजूनही नुकसानग्रस्त पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. सध्या शेतीमध्ये रब्बी हंगामासाठी पेरणी सुरू आहे. अशावेळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली तर, काहीअंशी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.
निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोंढे, केशव आरमळ, दिगंबर पवार, रमिभाऊ आवरगंड, संतोष पाते, उस्मान पठाण, बंडु झाडे, चंद्रकांत लोखंडे, बाळासाहेब घाटोळ, माऊली लोडे, हनुमान भरोसे, हनुमान शिंदे हे उपस्थित होते.