परभणी - सेलू येथील राजीव गांधी नगरात ( Selu Rajiv Gandhi Nagar ) आज (सोमवारी) सकाळी 7 वाजेच्या सुमारास पती आणि पत्नीचा ( Married Couple Death ) संशयास्पद मृतदेह आढळून आला. ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. घरातील एका खोलीत पतीने गळफास घेतलेला, तर पत्नीचा मृतदेह पलंगावर आढळून आला आहे.
तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह - अर्जून गणेश आवटे (30) व प्रियांका (28) असे मृत जोडप्याचे नावे आहेत. या संदर्भात सेलू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जून गणेश आवटे हा रिक्षाचालक होता. तो पत्नी प्रियंकासह राजीव गांधी नगरात राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. आवटे पती-पत्नी रविवारी रात्री जेवणानंतर घरातील एका खोलीत झोपले होते. मात्र, आज सकाळी ७ वाजले तरी दोघेही झोपेतून उठले नसल्याने अर्जुनच्या बहिनीने रूमची कडी वाजवली, तरीही ते बाहेर आले नाही. त्यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता, दोघेही मृत अवस्थेत आढळून आल्याने परिवारातील व्यक्तींना धक्का बसला.
पती लटकलेला तर पत्नीचा मृतदेह पलंगावर - अर्जून याचा मृतदेह नायलॉन दोरीच्या साहायाने गळफास घेतलेला, तर प्रियंकाचा मृतदेह पलंगावर आढळून आला आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळास भेट देऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे.
घटनेमागील कारण अस्पष्ट - दरम्यान, पती-पत्नीच्या आत्महत्येमागील ठोस कारण अजूनही पोलिसांच्या लक्षात आलेले नाही. त्यांनी एकत्र आत्महत्या केली की, आधी पतीने पत्नीला मारले? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे यासंदर्भातील अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.