परभणी - येथील नवोदय विद्यालयामध्ये गेल्या दीड महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे हरियाणा राज्यातील फतियाबाद येथील 3 शिक्षक आणि 13 विद्यार्थी अडकले होते. ते सर्वजण आज मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून स्वराज्यात रवाना झाले आहेत. यावेळी विद्यालयाच्या प्रशासनाने संपूर्ण बसचे निर्जंतुकीकरण करून सोशलडिस्टन्सचा अवलंब करत ही बस रवाना केली.
22 मार्च रोजी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या जनता कर्फ्यूनंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला. ज्यामुळे देशभरातील पर्यटक, विद्यार्थी, कामगार आणि इतर नागरिक आहेत, त्या जिल्ह्यात तसेच विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. मात्र, आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये शासनाकडून अडकलेल्या लोकांच्या स्थलांतराची परवानगी देण्यात आली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या नवोदय केंद्रीय विद्यालयाच्या शाळेत हरियाणा राज्यातील 9 वीच्या वर्गात शिक्षण घेणारे 13 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गेल्या दीड महिन्यापासून अडकले होते. या निर्णयामुळे त्यांना या ठिकाणाहून हरियाणा राज्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परवानगी दिली. त्यानुसार हे विद्यार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या शयनयान बसमधून मंगळवारी संध्याकाळी 7:30 वाजता हरियाणा राज्याकडे रवाना झाले. या बसमध्ये दोन चालकांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण बसचे निर्जंतुकीकरण करून विद्यार्थ्यांना मास्क आणि प्रत्येकाला हँड-सॅनिटायझर देण्यात आले.
हरियाणातही होते परभणीचे 21 विद्यार्थी -
दरम्यान, हरियाणा राज्यातील फतीयाबाद नवोदय विद्यालयात देखील परभणीतील 21 विद्यार्थी होते. मात्र, ते विद्यार्थी लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच परभणीत परतले. त्या विद्यार्थ्यांसोबत आलेले तीन शिक्षक परभणीतच अडकून राहिले. तेदेखील आता या 13 विद्यार्थ्यांसोबत हरियाणा राज्यात परतले आहेत. हरियाणा येथील विद्यालयात परभणीतील एक शिक्षिका अडकली असून त्यांची याच बसणे परत येण्याची व्यावस्था करण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुरेंद्र लोखंडे यांनी दिली आहे.