परभणी - महाविकास आघाडी सर्व ठिकाणी एकत्रित लढावी, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे. पण सर्व ठिकाणी सर्वांचेच एकत्रीकरण होईल, असे नाही. शक्य असेल त्या ठिकाणी एकत्रित येतील. मात्र, सध्या तिन्ही पक्षांना कोरोनाच्या संसर्गाची अडचण आहे. स्थानिक पातळीवर मेळावे घेणे किंवा तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र बसून त्यांचे एकमत करणे, हे शक्य झाले नाही. त्यामुळे स्थानिक प्रमुख नेत्यांचे मन साधण्याचे कामे आम्ही करत आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत सांगितले. परभणी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या प्रकल्पांच्या दुरुस्तीचे आदेश
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तत्काळ पंचनामे करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
पूर्णा नदीवर 4 बंधारे
जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील ममदापूर, जोड परळी, कोटा आणि पिंपळगाव कुटे या भागात नवीन बंधाऱ्यांची कामे नदी पत्रात पाणी असल्याने प्रलंबित होते. मात्र, आता हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे प्रस्तावित बंधारे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. जायकवाडी डावा आणि उजवा कालव्याची वाहन क्षमता कमी झाली आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेत या कालव्यांची सुधारणा केली जाईल व आधुनिकीकरण केले जाईल. उच्च दर्जाचे काम करत हे कालवे अत्याधुनिक केले जातील, असे आश्वासनही मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
भारत बंदला 'राष्ट्रवादी'चा पाठिंबा
भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा असून, २७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या भारत बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले. तसेच देशभरातील १०० पेक्षा जास्त संघटनांनी या भारत बंद आंदोलनाची हाक दिली असून, सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - आगामी निवडणुका नव्या ओबीसी अध्यादेशातील तरतुदींनुसार व्हाव्यात - खासदार सुनील तटकरे