परभणी - पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा टाकला. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत हा जुगार अड्डा सुरू होता. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली आहे. या जुगाऱ्यांकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य, असा एकूण 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैद्य धंदे चालकांचे धाबे दणाणले-
महिनाभरापूर्वी रूजू झालेले पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गुटखा आणि वाळू माफियांसह अवैद्य धंदे चालकांवर कारवाईचा फास आवळला आहे. त्यांची नजर आता परभणी जिल्ह्यात चालणाऱ्या जुगार अड्डे आणि मटका बुकी चालकांकडे वळली आहे. त्यानुसार कारवाईचा धडाका सुरू झाला असून अवैद्य धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळण्यात येत होता-
परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या विशेष पथकाने गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील शिवराम नगर परिसरात हा छापा टाकला. शिवराम नगरातील गोविंद काकडे यांच्या घरात चालणाऱ्या या हायप्रोफाइल जुगार अड्ड्यावर 'झन्नामन्ना' नावाचा जुगार खेळण्यात येत होता.
7 जुगाऱ्यांचा रंगला होता पत्याचा डाव -
पोलिसांनी छापा टाकला तेव्हा, शेख हबीब शेख मासूम, मतीन खान मकसूद खान, युसूफ खान शब्बीर खान पठाण, किशोर श्रीकिशन तोष्णीवाल, सिध्दार्थ हरिभाऊ खाडे, सय्यद हनीफ सय्यद अहमद व गोविंद एकनाथ काकडे या 7 जुगाऱ्यांचा पत्याचा डाव रंगला होता. तेव्हा पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई-
या प्रकरणी पोलीस नाईक राहुल दत्तात्रय चिंचाणे यांच्या तक्रारीवरुन कलम ४,५,१२ ( अ ) प्रमाणे नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही धाडसी कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक यशवंत वाघमारे, राहुल चिंचाणे, शंकर गायकवाड, शेख अजहर, दीपक मुदिराज, जब्बार या विशेष पथकाने केली आहे.
हेही वाचा- कुख्यात गुंडाच्या हत्येप्रकरणी दोन तरुणांना अटक, मृत्यूच्या भीतीपोटी केली हत्या
हेही वाचा- लग्नावरुन परतणाऱ्या १४ वऱ्हाडींवर काळाचा घाला; उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील घटना