परभणी - येथील जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे तब्बल 800 किलो गोमांस जप्त केले. तसेच वाहनांसह 4 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय याच पथकाने पूर्णा शहराजवळ रेतीने भरलेला टिप्पर पकडून वाहनाच्या चालक आणि मालकास देखील ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन 10 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गेल्या आठ दिवसांपासून अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. बंदी असलेल्या गुटका, अवैद्य दारूचे अड्डे, मटका बुकी आणि रेती व जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्याप्रमाणात कारवाई केली आहे. या कारवायांमुळे अवैद्य धंदेचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
विशेष पथकाला मिळाली होती टीप
सादर गोवंश जनावरांच्या मासाची वाहतुक होणार असल्याची टीप विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक बाबासाहेब दडस, फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, राहुल चिंचाणे, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी पठाण हे यांनी परभणीहुन पाथरीकडे गोमांसाने भरलेले पांढऱ्या रंगाचे पीकअप वाहन (क्र. एम एच 14 डीएम 4915) थांबवले. वाहन चालकाची चौकशी असता, त्याने त्याचे नाव मोमिन यसुफ मोमिन अजिम (रा.बीड) असे सांगितले. त्यास पथकाने वाहनांमध्ये काय आहे, असे विचारले. त्यावेळी त्याने गोमांस असल्याचे स्पष्ट केले. तसेच अब्दुल समद अब्दुल रहिम कुरेशी (रा.परभणी) यांचे ते असून खंडोबा बाजार परभणी येथून भरले असल्याचे त्याने सांगितले. पाथरी येथे जाण्यास सांगितल्याने आपण ते घेऊन जात असल्याचेही चालक म्हणाला.
'डॉक्टरांनी तपासणी करून गोमांस असल्याचे केले स्पष्ट'
यावेळी पथकाने वाहनाची पाहणी केली असता, त्यात 8 टाक्यांमध्ये गोमांस ठेवल्याचे दिसून आले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी गोमांसबाबत खात्री करून घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.जे.के. सोळंके यांना पाचारण केले. डॉ.सोळंके यांनी घटनास्थळी येऊन तपासणी करत गोमांस असल्याचे स्पष्ट केले. पथकाने गोमांसाने भरलेले वाहन ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. कर्मचारी अजहर पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पठाण करीत आहेत.
'पूर्णेत अवैध रेतीचे वाहन पकडले'
याच पथकाने पुर्णा शहरातील पिंपळगांव फाटा येथे मध्यरात्री एक रेतीने भरलेला टिप्पर पकडला. रेतीचे चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने हा टिपर जात असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोलिसांनी हा टिप्पर (एम.एच.22 एन.) ला थांबविला. वाहन चालक आणि मालक यांना ताब्यात घेवुन पोलिसांनी (किंमत अंदाजे 10 लाख व वाळु 18 हजार) एकुण 10 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी यशवंत वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन 2 आरोपी विरुध्द पुर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.