परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी युती आणि आघाडीची यशस्वी बोलणी झाल्याने परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे. असे असले तरी गेल्या ३ वर्षांपासून लोकसभेसाठी सक्रिय झालेल्या भाजपच्या युवानेत्या मेघना बोर्डीकर या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सेनेच्या उमेदवाराला त्यांचे आव्हान असेल, तर दुसरीकडे वंचित आघाडीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. त्यामुळे वंचित आघाडीच्या उमेदवाराचा मोठा परिणाम राष्ट्रवादीच्या उमेदवारावर होण्याची शक्यता आहे.
परभणी लोकसभेसाठी भाजपच्या इच्छुकांनी केलेली मोर्चे बांधणी निष्फळ ठरली. मुंबईत झालेल्या शिवसेना-भाजपच्या युतीमुळे परभणी लोकसभेसाठी विद्यमान शिवसेनेचा उमेदवार निश्चित आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयारी करणाऱ्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर व मेघना बोर्डीकर यांचे सेनेपुढील आव्हान संपुष्टात आले आहे. राज्यात २५ जागांवर भाजप तर २३ जागा शिवसेना लढवणार आहे. त्यात दोन्ही पक्षांच्या विद्यमान जागा कायम राहतील. विशेष म्हणजे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या परभणी लोकसभेत सेनेचा उमेदवार कायम राहणार आहे.
परभणी लोकसभा मतदार संघात १९५७ ते १९७७ पर्यंत काँग्रेसच्या खासदाराने प्रतिनिधीत्व केले आहे. त्यानंतर १९७७ मध्ये या मतदार संघात शेकापचे शेषराव देशमुख खासदार म्हणून विजयी झाले. पुन्हा १९८० पासून काँग्रेसच्या खासदारांची परंपरा सुरु झाली. सलग दोनवेळा काँग्रेसचे खासदार या मतदार संघात विजयी झाले. त्यानंतर ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देऊन मराठवाड्याच्या राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेला या मतदार संघात यश आले. हे यश सलग तीन कार्यकाळ अबाधित राहीले. मात्र १२ व्या लोकसभेत या मतदार संघात मतांच्या विभाजनामुळे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. परंतु तो कार्यकाळ केवळ १३ महिन्यांचा ठरला. परत १३ व्या लोकसभेपासून ते आजतागायत या मतदार संघात शिवसेनेचे खासदार विजयी होत आले आहेत.
सलग ३० वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी - काँग्रेस सज्ज आहेत. शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोर येणाऱ्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या नावाची आता औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यांनी गेल्या महिनाभरापासून प्रचारास सुरुवात देखील केली आहे.
"शिवसेना इतिहास मोडणार....!"
गेल्या ३० वर्षांपासून परभणी लोकसभेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवसेनेचे वैशिष्ट्य म्हणजे एकही उमेदवार पुन्हा शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा उभा राहिला नाही. प्रत्येकाने कार्यकाळ संपल्यावर दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. याला विद्यमान खासदार संजय जाधव हे अपवाद ठरले आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या जाधव यांच्याकडून पक्षाला देखील हीच अपेक्षा होती. त्यानुसार ते पक्षात कायम राहिले असून त्यांनी शिवसेनेचा फुटीचा इतिहास मोडून काढला आहे. त्याामुळे शिवसेनेकडून खासदार जाधव यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यांना काही प्रमाणात विरोध होत असला, तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच परत संधी देण्यात येईल, असे विधान केल्याने संजय जाधव हे शिवसेनेकडून निश्चित मानले जात आहेत.
" मेघना बोर्डीकरांची बंडखोरी... ?"
परभणी लोकसभा मतदार संघात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने भेटी देणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी युतीनंतर त्यांच्या भेटींना 'ब्रेक' दिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून इच्छुक असलेल्या मेघना बोर्डीकर मात्र मतदार संघात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. त्या बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने त्या माघारी फिरणार नाहीत. त्यांच्या या निर्णयामुळे मात्र शिवसेनेचे खासदार जाधव यांची डोकेदुखी वाढणार आहे.
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात प्रकाश आंबेडकर यांनी परभणीत जोरदार सभा घेऊन प्रचंड प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले होते. त्यांच्या पक्षाकडून परभणीत मुस्लीम समाजातील उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास याचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसणार आहे.