परभणी - गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या परभणी जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर विजय मिळविणार असल्याचे खासदार जाधव म्हणाले.
महाविकास आघाडीतील दोन पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळणार
विशेष म्हणजे, आजच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत 'परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर मोठ्याप्रमाणात राष्ट्रवादीचा विजय झाला असून, राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे खासदार जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केल्याने येणाऱ्या काळात महाविकास आघाडीतील या दोन पक्षांमधील संघर्ष पाहायला मिळणार, हे मात्र निश्चित. कारण यापूर्वीदेखील खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांवर आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता. पालकमंत्री हे अन्य पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच एका जमिनीच्या प्रकरणावरून देखील खासदार जाधव आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यात वाद निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळातील निवडणुकांच्या माध्यमातून दोन पक्षांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
ग्रामपंचायत हा ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया
शिवसेनेच्या वतीने शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात आज जिल्ह्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार जाधव बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ग्रामपंचायत हा ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. तेव्हा निवडून आलेल्या सदस्यांनी आपले पाय जमिनीवर ठेवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. शिवसैनिकांनी निष्ठा ठेवून काम करावे. तर आमदार डॉ.राहुल पाटील म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण असून निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी या धोरणानुसार काम करावे.