परभणी - महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या, योनेक्स सनराईज वरिष्ठ आंतरजिल्हा व राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्याचा 'मान' परभणी जिल्हा बॅडमिंटन संघटनेला मिळाला आहे. येत्या १३ ते १८ ऑगस्ट दरम्यान शहरातील बॅडमिंटन हॉल आणि शिवाजी महाविद्यालयात ही स्पर्धा रंगणार आहे. बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आयोजीत पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
या पत्रकार परिषदेतला बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष विजय जामकर, सचिव रविंद्र देशमुख, मनपा सभापती सुनील देशमुख, आशिष शहा, सुधीर मांगूळकर आदी उपस्थित होते.
यावेळी देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे, १३ ऑगस्टला सकाळी ९ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून, १३ व १४ ऑगस्टला थॉमस व उबेर चषक नियमानुसार सांघिक स्पर्धा होणार आहे. त्यानंतर १५ ते १८ ऑगस्ट या काळात वैयक्तीक स्पर्धा होणार आहेत. त्यात पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, महिला दुहेरी या गटाचा समावेश आहे.
सांघिक स्पर्धेचे पारितोषिक वितरण १५ ऑगस्टला सकाळी १०.३० वाजता होणार असून, वैयक्तीक स्पर्धेचे पारितोषिक वितरण १८ ऑगस्टला सायंकाळी ८ वाजता होणार आहे. ही स्पर्धा सिंथेटीक हुआ कोर्ट मॅटवर खेळविली जाणार आहे.
स्पर्धेत महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यातून जवळपास ३०० ते ३५० खेळाडू सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच या स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी आमदार डॉ. राहुल पाटील, विजय भांबळे, डॉ. मधुसुदन केंद्रे, बिप्लव बाजोरिया यांचे सहकार्य लाभल्याची माहिती आयोजन समितीने दिली.
ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी परभणी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विजय जामकर, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सचिव रविंद्र देशमुख, आशिष शहा, सुधीर मांगूळकर, उन्मेश गाडेकर,श्याम जेथलिया, पांडुरंग कोकड, नरेंद्र झांझरी, विनोद जेठवाणी, रफिक वाघाणी, भगवान कोठारी, अमोल ओझळकर, विकास जोशी, सागर पातूरकर, इंद्रजीत वरपूडकर, सुनील देशमुख आदी परिश्रम घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.