परभणी - रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर उचलले कर्ज फेडणे तर लांबच राहिले, आधी त्यांना त्यांच्या उसाचे थकलेले पैसे देवून पुण्य वाटून घ्यावे आणि मग निवडणूक लढवावी. असा टोला आज परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना लगावला. तसेच जर रत्नाकर गुट्टे गंगाखेड विधानसभेचे युतीचे उमेदवार असतील, तर आम्ही विशाल कदम यांची उमेदवारी मागे घेवू. मात्र, विशाल कदम जर अधिकृत उमेदवार असतील, तर गुट्टे आपला अर्ज मागे घेणार का? असा सवाल देखील खासदार संजय जाधव यांनी रविवारी परभणीत झालेली पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी रासपच्या एबी फॉर्मवर कारागृहात असलेल्या उद्योजक रत्नाकर गुट्टे यांनी उमेदवारी दाखल केली. परंतु, गेल्या ४ दिवसांपूर्वीच शिवसेनेने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर केली. त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला, त्यानुसार त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे. मात्र, असे असतानाही रत्नाकर गुट्टे यांनी दाखल केलेल्या उमेदवारीमुळे महायुतीतील बेबनाव पुढे आला. त्यामुळे परभणी जिल्ह्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत खासदार संजय जाधव यांनी आपली भूमिका पत्रकारांजवळ मांडली. यावेळी विधानसभा प्रमुख माणिक पोंढे उपस्थित होते. पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले, गुट्टे ऐनवेळी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. त्यांचा महायुतीशी काहीही संबंध नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील, तेव्हा आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत. मात्र, गुट्टे यांनी भरलेला फॉर्म जुनाच आहे, तो कोणता, कुठून आणला, माहीत नाही? असाही सवाल केला.
हेही वाचा - पाथरीचे आमदार मोहन फडांना शक्ती प्रदर्शन पडले भारी; व्यासपीठच कोसळले, कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान, पाथरी, जिंतूर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या काही लोकांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केला आहे. ते सर्वजण अर्ज मागे घेतील, शिवसेनेकडून झालेली बंडखोरी वापस होईल, अशीही ग्वाही खासदार जाधव यांनी दिली. तसेच परभणीत आणि पाथरीत युतीच्या उमेदवाराचे काम करून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू, असा उपरोधक टोलासुद्धा त्यांनी सेनेचे उमेदवार डॉ.राहुल पाटील आणि रिपाइंचे उमेदवार मोहन फड यांना लगावला. कारण, पाटील आणि फड यांनी लोकसभेत खासदार जाधव यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्याचे समर्थक करतात, त्यातूनच त्यांनी ही कोपरखळी मारली.
उध्दव ठाकरेंकडे मनोमिलन होईल -
दरम्यान, खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यात मनोमिलन झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात यास खासदार जाधव यांनी नकार दिला. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच आमचे मनोमिलन होईल, तेथे आम्ही खुलासा करू, काळी जादू कोणी केली? अजून काय काय असेही ते म्हणाले.
हेही वाचा - गंगाखेड मतदारसंघासाठी रत्नाकर गुट्टे यांनी कारागृहातूनच भरला उमेदवारी अर्ज