परभणी - 'शेतकऱ्यांची शेती टिकवण्यासाठी अधिकाधिक पेटंट घेणे आवश्यक असून, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संशोधकांनी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे, तरच विद्यार्थ्यांचे व देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ते येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात (शनिवारी, दि. 7 ऑगस्ट)रोजी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुरू डॉ. अशोक ढवण, पोलीस अधीक्षक जयंत मीना व राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
'बांबू लागवड' व 'अन्नतंत्र' ला भेट
राज्यपाल शुक्रवारी परभणीत मुक्कामी होते. त्यांनी आज शनिवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील बांबू लागवड प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी अन्नतंत्र महाविद्यालयाला भेट देऊन, त्या ठिकाणच्या उपक्रमाबाबत माहिती जाणून घेतली. याप्रमाणेच कोश्यारी यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वसतीगृहावर जाऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. यानंतर दुपारी 12 वाजेच्या सुमारास त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात प्राध्यापक आणि संशोधकांशी संवाद साधला.
उत्तम शेती, मध्यम व्यापार -
'उत्तम शेती मध्यम व्यापार आणि नोकरीला तर दुय्यम समजले जाते. या पार्श्वभूमीवर सर्व तरुणांनी शेतीमध्ये आपले योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी प्राध्यापक आणि संशोधकांना यावेळी केले आहे. तसेच, शेतीमध्ये यापुढे चांगल्या प्रकारे काम कसे करता येईल, याचे प्रयत्न करावेत, त्यासाठी शेतीचे पेटंट होणे आवश्यक आहे. तरच, शेतकऱ्यांचा विकास होऊ शकेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले पाहिजे -
देशाची प्रगती ही कृषी क्षेत्राच्या प्रगतीवरच अवलंबुन आहे. सन 2022 हे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व परभणी कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, या वर्षात शेतकरी बांधवाच्या समृध्दीसाठी सर्वांना आपण एकत्रीत काम करू, संपुर्ण जगातील व देशातील ज्ञान संपादन करून सर्वांच्या विकासासाठी उपयोग करायला हवा. विद्यापीठात विकसित झालेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले पाहिजे. दरम्यान, विद्यापीठात रिक्त पदाची समस्या आहे. शैक्षणिक दर्जा टिकवण्यासाठी अध्यापकांच्या पदभरतीसाठी प्रयत्न केला जाईल. तसेच, विद्यापीठ राबवत असलेले हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ उपक्रम चांगला उपक्रम असल्याचेही कोश्यारी यावेळी म्हणाले आहेत.