परभणी - पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या पाठोपाठ आता गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी देखील पंकजा मुंडेंसाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. कारण 'भाजपच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवाने आपण व्यथित झालो आहोत, त्यांच्यासाठी गंगाखेड विधानसभेचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे गुट्टे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने समर्थकांनी माझ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू नये, असे आवाहन देखील गुट्टे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
रासपचे महादेव जानकर यांच्या पक्षाच्या वतीने गंगाखेड मतदार संघातून एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे निवडून आले आहेत. महायुतीत गंगाखेडची जागा शिवसेनेला असताना देखील रासपने बंडखोरी करत या ठिकाणी रत्नाकर गुट्टे यांना एबी फॉर्म दिला. एवढेच नव्हे तर महादेव जानकर स्वतः रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी मतदारसंघात ठाण मांडून होते. विशेष म्हणजे कारागृहात राहून रत्नाकर गुट्टे यांनी ही निवडणूक जिंकली. परंतु महादेव जानकर आणि पंकजा मुंडे हे आपले आधारस्तंभ आहेत. त्यांच्यासाठी आपण पदाचा त्याग करण्यास तयार आहेत. तसेच गंगाखेड मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी. त्या मताधिक्यांनी निवडून येतील, असा विश्वास देखील आमदार गुट्टे यांच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आला आहे.
आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड यांच्यावतीने हे पत्रक काढण्यात आले आहे. या पत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्यातील जनतेसाठी संघर्षातून त्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांचा पराभव माझ्यासाठी अंत्यत दुर्देवी घटना आहे, असेही आमदार गुट्टे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.