परभणी - 'कोरोना' विषाणूच्या निदानाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकऱ्यांच्या मार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्या प्रस्तावास मान्यता देवून परभणी येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारणीस तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे यासाठीचा 81 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वापरण्यात येणार असल्याने शासनाला कुठलाही वेगळा निधी पाठवावा लागणार नसल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात त्यांनी आज (शनिवारी) आपली मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी सध्या पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. त्याचे निदान होण्यासाठी अनेकदा विलंब होतो. त्यामुळे कोरोना व भविष्यात उदभवणाऱ्या कोणत्याही संसर्गजन्य रोगातील विषाणूच्या निदानासाठी स्थानिक पातळीवर तपासणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाने एक प्रस्ताव तयार करून तो २५ मार्च रोजीच परभणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या मार्फत राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यासाठी ८१ लाख ६४ हजार रुपायाचा निधी जिल्हा नियोजन समितीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणाार असल्याने सदर प्रयोगशाळेसाठी राज्य शासनाकडून वाढीव निधीची गरज नसल्यामुळे सदरील प्रस्तावास त्वरीत मंजुरी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली. याबाबत पुढे बोलताना डॉ.पाटील म्हणाले की, येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचे बळकटीकरण या माध्यमातून झाल्यास स्थानिक पातळीवरच कोरोनाची चाचणी होणार आहे. ज्यामुळे वेळेची व पैशाचीही बचत होवून संसर्गजन्य रोगाचे निष्कर्ष लवकर हाती येतील. त्या दृष्टीने हा प्रस्ताव अत्यंत महत्वपुर्ण ठरणार आहे.
या प्रयोगशाळेसाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. मार्कण्डेय, प्रमुख संशोधक डॉ.आनंद देशपांडे, डॉ. सतीश गायकवाड, डॉ. प्रभाकर घोरपडे असे आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध असल्याने अद्यावत प्रयोगशाळा उभारणीस मदत होईल. ही प्रयोगशाळा केवळ परभणीसाठीच नव्हे तर शेजारील हिंगोली, वाशीम, बुलढाणा आणि आजुबाजुच्या सर्व जिल्हयांना कोरोना आणि भविष्यात उदभवणाऱ्या अन्य साथींच्या रोगांचे निदन करण्यासाठी निश्चीत उपयोगी पडेल, असेही आमदार डॉ.पाटील यांनी सांगितले.
" अवघ्या काही तासात कोरोनाचे निदान"
तसेच या संदर्भात आमदार पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच आसीएमआर संचालक नवी दिल्ली आणि कुलगुरु म.प.वि.वि. नागपूर यांच्याशी देखील थेट संपर्क करून या प्रस्तावास तात्काळ मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे. अशा प्रकारची प्रयोगशाळा परभणीत उभारणे आवश्यक आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास अवघ्या काही तासात कोरोनाचे निदान होवून त्यास विलगीकरण कक्षात ठेवायचे की (निगेटीव्ह असेल तर) सोडून द्यायचे, याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.