परभणी - 'कोरोना' सारख्या भयंकर संसर्गजन्य रोगाची साथ पसरू नये म्हणून दिवसरात्र जनतेच्या रक्षणार्थ कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुवारी जिंतूर शहरात देखील तालुका व्यापारी महासंघाकडून पोलिसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिंतूर पोलिसांनी मुख्य बाजारातून पथसंचालन केले असता, त्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.
जिंतूर शहरात परभणी पोलीस दलातील अतिशीघ्र दल, दंगा पथक व सामान्य पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पथसंचलन पार पडले. शहरातील प्रमुख मार्गावरून हे संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाचे मनोबल वाढण्यासाठी कापड बाजारपेठ दरम्यान संचलन आले असता, व्यापारी महासंघाने आयोजन केल्याप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जिंतूरचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे पुष्पहार घालून संजय कोकडवार यांनी स्वागत केले, तर सर्व पोलीसदलावर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत केले. या उपक्रमात सुनील तोष्णीवाल, प्रदिप कोकडवार, गणेश कुरे, बद्रीनारायन पोरवाल, दिलीप चिद्रवार, भायेकर, भाकरे, बिपीन चिद्रवार, गिरीष वट्टमवार, गजानन कोकडवार, कृष्णा कोकडवार आदी व्यापारी बांधवांनी सहभागी झाले होते.