परभणी - सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या वेतनातील फरकाचे बिल मंजूर करण्यासाठी मुख्याध्यापकाने पाच हजारांची लाच घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सोनपेठच्या मुख्याध्यापकला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याला आज न्यायालयात हजर केले आहे.
पंढरीनाथ लक्ष्मणराव जोशी (वय-54 वर्षे) असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते सोनपेठ येथील महालिंगेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आहेत. त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या एका शिक्षकाला सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या फरकाची रक्कम हवी होती. यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांकडे अर्ज केला. मात्र, संबंधित बिल मंजूर करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, अशी मागणी जोशीने केली.
हेही वाचा - आमचे फोन टॅप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल'
या शिक्षकाने परभणीच्या लाचलुचपत विभागाकडे संबंधित प्रकरणाची तक्रार दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी सोनपेठ येथील शाळेत जाऊन सापळा रचला. त्यानुसार शुक्रवारी(24जानेवारी) संध्याकाळी मुख्याध्यापक जोशी यांना पाच हजारांची लाच स्वीकारताना अटक झाली आहे. मुख्याध्यापकावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. संबंधित कारवाई लाचलूचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक भरत केशव हुंबे, पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले, कर्मचारी बहनुमंते यांनी केली.