परभणी - जिल्ह्यातील नागरिकांचे स्थानिक प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर सत्तेत असताना 'नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आदी सर्वच स्थानिक निवडणुका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी दिली.
परभणी येथील स्टेडियम मैदान परिसरात आयोजित पत्रकार परिषदेत बोधने बोलत होते. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी बोधने यांनी प्रहार जनशक्ती पक्ष राज्य सरकारमध्ये सत्तेत असला तरी स्थानिक नागरिकांचे मुद्दे सोडवण्यासाठी या निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहोत, असे सांगितले.
नागरिकांचे प्रश्न सोडवू-
दरम्यान, आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे प्रश्न मागे पडले आहेत. जिल्ह्यात विकास कामे झाली नाहीत. विकासापासून जिल्हा कोसो दूर आहे. त्यामुळे नागरिकांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचा आणि जमिनीवर पाय असणारा पक्ष हवा आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आम्ही परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास करू आणि नागरिकांचे प्रश्न सोडवू, असावा विश्वास बोधने यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात आठ-दहा महिन्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका -
जिल्ह्यात येत्या आठ ते दहा महिन्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, 'एवढ्या वर्षात नागरिकांचे मूलभूत प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठीच आम्ही या निवडणुका लढवून जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी नागरिकांनी नाकर्त्या लोकप्रतिनिधींना नाकारून प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांना स्वीकारावे', असे आवाहन देखील बोधने यांनी केले.