परभणी - महापालिकेचे उपमहापौर माजू लाला यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यावरून पोलिसांनी निवडणूक प्रशासनाच्या पथकासह त्यांच्या घरावर छापा टाकला. मात्र, संपूर्ण घराची झडती घेऊनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून ही कारवाई केल्याचा आरोप माजू लाला यांनी केला.
सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात आला आहे. उमेदवार आणि विविध पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. सोबतच आर्थिक देवाण-घेवाण देखील होत आहे. विविध ठिकाणी मतदारांना आमिष दाखवणाऱ्या वस्तू, दारू आणि पैसा पकडल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी येथील महानगरपालिकेचे काँग्रेसचे उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्या घरी पैसे वाटप होत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या शाही मशिदीजवळ निवासस्थानी निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथक क्रमांक दोनसह छापा टाकला. संपूर्ण घराची झाडाझडती घेण्यात आली. मात्र, घरात कोठेही पैसे अथवा इतर गोष्टी सापडल्या नाही. त्यांनतर पोलिसांनी पंचनामा करून काहीच सापडले नसल्याचे पत्र माजू लाला यांना दिले. या पथकात १२२ पोलीस, १३ होमगार्ड, ९ वाहने, दंगा नियंत्रण पथकासह मोठा फौजफाटा घेवून तपासणी करण्यात आली, तर पथकात पथकप्रमुख जी. आर. वैरागड, सहाय्यक एस. यू. राठोड, एस. ए. पठाण, एम. एस. जयस्वाल आदींचा समावेश होता.
'माजूलाला काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराच्या पाठीशी'
परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेसकडून रविराज देशमुख, अपक्ष सुरेश नागरे हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी अपक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या पाठीशी माजू लाला असून ते त्यांचा उघडपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे नागरेंची ताकद वाढली आहे. नागरे हेच आता मुख्य प्रतिस्पर्धी झाले असून माजू लाला यांचा त्यांना किती फायदा होतो? हे येणाऱ्या 24 तारखेला करणार आहे.
'भीती निर्माण करण्याचा प्रयत्न - माजूलाला'
सुरेश नागरे यांना वाढता जनाधार लक्षात घेता सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरून सूडबुध्दीने ही कारवाई झाली आहे. मुस्लीम समाजात भीती निर्माण करून त्यांना मतदानापासून दूर करण्याचे हे एक षडयंत्र आहे. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस प्रशासनाचा दुरुपयोग केला जात आहे. मात्र, मुस्लीम समाज घाबरणार नाही. जास्त जोमाने मतदान करून जातीवादी शक्तींना रोखण्याचे काम करेल, असेही यावेळी माजू लाला म्हणाले.