परभणी - संशयित आरोपींना पकडण्यासाठी जिल्ह्यात शोधमोहीम राबवली जात आहे. अशाच एका कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २ आरोपींना अटक केली. यावेळी त्यांच्याकडे एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूसे आणि इतर धारधार शस्त्रे जप्त करण्यात आली.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले, आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती. त्याआधारे परभणी शहरातील उड्डान पुलाखाली सापळा रचला. या ठिकाणाहून एका वाहनातून जाणाऱ्या २ संशयितांचा पाठलाग केला. काही अंतरावर त्यांना थांबवून त्यांची झडती घेतली. तेव्हा त्यांच्याकडून १ गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्र मिळून आले. हे आरोपी हिंगोली जिल्ह्यातील असून करतारसिंग हत्यारसिंग टाक (१९) आणि कुलदिपसिंग चतुरसिंग टाक (२०) अशी त्यांची नावे आहेत. त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून वाहनासह धारदार शस्त्र असा ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कापुरे यांच्या पथकातील राजेश आगासे, सुनील गोपीनवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारोखी, अरुण कांबळे, गौस पठाण, दिलावर पठाण, शंकर गायकवाड, विशाल वाघमारे यांनी केली.