परभणी - बिअर बारमध्ये बिलाचे पैसे न देता उलट त्याच्याच गल्ल्यातील १२ हजार रुपये लुटून फरार झालेल्या ६ आरोपींना केवळ ६ तासात परभणी पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना जिंतूर शहरातील जालना रस्त्यावरील आनंद हॉटेल बार अँड परमीट रुममध्ये रात्री ९.३० च्या सुमारास घडली होती. पोलिसांनी मध्यरात्रीतच या चोरांना ताब्यात घेतले.
या बार मध्ये ५-६ व्यक्ती जेवणासाठी आले होते. जेवण झाल्यानंतर बिलाचे पैसे मागितल्याने या व्यक्तींनी गोंधळ घातला. हॉटेलचे मालक, नोकर आणि व्यवस्थापकाला मारहाण करून हॉटेलच्या गल्ल्यातील १२ हजार रुपये काढून ते पसार झाले. यानंतर हॉटेल मालक दत्ता कुंडलिकराव नवले यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी एक पथक तयार करून घटनास्थळास भेट दिली. आणि पहाटेच आरोपींचा शोध सुरू केला.
पथकाने या गुन्ह्यातील आरोपी शेख फय्याज शेख गौस, आशिष गौतम जावळे, सय्यद फय्याज सय्यद रहीम, शेख कैफ शेख खदीर, सय्यद इम्रान सय्यद फेरोज आणि शाहेद खान सादेक खान पठाण (रा. जिंतूर) यांना ताब्यात घेतले. या आरोपींकडे विचारपूस केल्यानंतर आरोपींची गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यामध्ये १ कारही वापरल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी (एमएच १५ सीएच ९९०९) ती कार जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, हवालदार शरद मुलगीर, लक्ष्मीकांत धृतराज, ताजोद्दीन शेख यांनी बजावली.
