परभणी - जिल्ह्यात आजही इंधनदराचा भडका उडाला आहे. राज्यात सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री परभणीत होत आहे. साध्या पेट्रोलचा आजचा दर 98.43 रुपये प्रति लिटर आहे. येत्या काही दिवसात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०० रुपये होणार असल्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पावर पेट्रोलने 3 दिवसांपूर्वीच शंभरी पार केली आहे. आज (गुरुवारी) पावर पेट्रोलचा दर 101.86 रुपये प्रति लिटर एवढा झाला आहे.
कोरोना महामारीत आधीच आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या नागरिकांची इंधन दरवाढीने पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शहरातील वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
पेट्रोल दरामुळे परभणी कायम चर्चेत -
परभणीतील पेट्रोल दराचा विषय हा कायम चर्चेत असतो. महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक वेळा देशात परभणीत विक्री होणाऱ्या पेट्रोलचा दर सर्वाधिक आढळून आला आहे. ज्यामुळे फारसे उद्योगधंदे नसणाऱ्या लहानशा या शहरातील वाहनधारक मेटाकुटीला आले आहेत. 'जगात जर्मनी भारतात परभणी' असे गमतीने म्हटले जाते. परंतु, परभणीचे नाव पेट्रोल दराच्या उच्चांकाने खरोखर चर्चेत आले आहे.
हेही वाचा-दिलासादायक! यंदा भारतीय कंपन्यांकडून सरासरी ७.३ टक्के होणार वेतनवाढ
इंधनाचे दर 11 महिन्यात 22 रुपयांनी वाढले!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा स्थितीत तेल वितरण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्याचे सांगितले जाते. इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. देशात करोनाच्या प्रादुर्भावामुळे टाळेबंदी जारी केल्यानंतर 23 मार्चला पेट्रोलची विक्री प्रति लिटर 76.37 रुपये दराने झाली होती. टाळेबंदीनंतर गेल्या 11 महिन्यात साधारणपणे 22 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. आज, गुरूवारी पेट्रोलचे दर 33 पैशांनी वाढले आहेत. त्यानुसार परभणीतील पंपावर साध्या पेट्रोलची किंमत 98 रुपये 43 पैसे प्रति लिटर एवढी आहे. तसेच पावर (स्पीड) पेट्रोलची किंमत 101.86 रुपये प्रति लिटर एवढी झाली आहे. याशिवाय डिझेलची किंमतदेखील 33 पैशांनी वाढून प्रति लिटर 88.04 रुपये आहे. हे तीनही दर राज्यात सर्वाधिक दर आहेत.
हेही वाचा-गुगल भारतामधील लघू उद्योगांना १०९ कोटींची करणार मदत
परभणीत इंधनाचे राज्यात सर्वाधिक दर असण्याचे हे आहे कारण
परभणी जिल्ह्यात इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, यासह रिलायन्स, एस्सार आदी खासगी कंपन्यांचे सुमारे शंभर ते सव्वाशे पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपाना पुरवठा होणारे इंधन प्रथम मुंबई रिफायनरीतून सोलापूर आणि मनमाड येथील डेपोला वितरित होते. त्यानंंतर हिंदुस्तान पेट्रोलियमसाठी सोलापूर तर इंडियन पेट्रोलियम व भारत पेट्रोलियमसाठी मनमाड येथून पेट्रोल आणि डिझेलची आवक होत असते. ही दोन्ही शहरे परभणीपासून सुमारे 300 ते 350 किमी दूर आहेत. शहरात इंधन वितरित करण्यासाठी वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. त्याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर परिणाम दिसून येतो, अशी माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे विक्री अधिकारी अमेय वरणगावकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
इंधनाच्या वाहतुकीवर होणाऱ्या खर्चाचा भुर्दंड नागरिकांना विनाकारण सहन करावा लागतो. त्यावर मार्ग काढावा, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.