परभणी - येेेथील शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी परभणीतील एका अज्ञात बड्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांची सुपारी दिल्याची तक्रार दोन दिवसांपुर्वी स्वतः जाधव यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तत्काळ तपासाची चक्रे फिरवून पथक तयार केेले. या धमकी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडच्या रिद्धा गॅगशी असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नांदेडमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी
खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी दोन कोटी रुपयांची सुपारी परभणीतून मिळाल्याची चर्चा नांदेडमध्ये दोन तरूण करत असल्याची माहिती जाधव यांना समजली होती. त्यानंतर त्यांनी परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल केली होती. खासदारांनाच जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने नानलपेठ व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांचे एक पथक स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या संशयिताकडून काय माहिती मिळते, त्याचा रिद्धा टोळीशी काही संबंध आहे का? नेमके या सुपारी प्रकरणामागे कोण आहे ? या संबंधी संशयिताकडून काही माहिती मिळते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
'धमकी प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली'
दरम्यान, खासदार संजय जाधव यांनी या धमकी प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या देखील कानावर घातली आहे. प्रकरण गंभीर असल्यामुळे परभणी पोलिसांना तातडीने चौकशीचे आदेश देऊन या प्रकरणामागे कोण आहे ? याचा छडा लवकरात लवकर लावावा, अशी विनंती आपण केली असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. गेल्या तीस-पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक कटु प्रसंग अनुभवले, पण माझे कुणाशी वैर नव्हते. राजकीय मतभेद किंवा वैमनस्य असेलही, पण जीवे मारण्याची धमकी, सुपारी देणे हा प्रकार म्हणजे अतिशय गंभीर आणि चिंता करायला लावणार आहे. मी ही धमकी सहज घेत नाही, पण मलाही कुणी सहज घेऊ नये, असा इशाराही संजय जाधव यांनी दिला. कोण, कुठली रिद्धा गँग मला माहिती नाही, पण मला जीवे मारण्यासाठी एवढ्या मोठ्या रक्कमेची सुपारी तीही परभणीतून कुणी दिली, याचा तपास लागणे गरजेचे आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांना धमक्या दिल्या जात होत्या, आता थेट खासदार आणि राजकीय पुढाऱ्यांना धमक्या मिळत असल्याने यांची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचेही खासदार जाधव म्हणाले.