परभणी - जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा जवळील वडी गावपरिसरात मागील आठवड्यात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडलेले आढळले होते. वनविभागाने त्याची सुटका केली. त्यानंतर गेल्या आठवडात वडी ग्रामस्थांना बिबट्या आणि एका पिल्लाचे दर्शन झाले. तर, काल (शुक्रवार) देखील गणेशपूर-वाघी रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनासमोर चक्क बिबट्या प्रकटला. याचा व्हिडिओ आता समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. तर मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा बिबट्याचे दर्शन झाल्याने जिंतूर तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.
व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
दरम्यान, बिबट्या वाहनासमोर आल्याचा हा व्हिडीओ आज (शनिवार) दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघी शिवारात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर पोलीस पाटील व गावकऱ्यांनी वनविभागाकडे याबाबत पत्रव्यवहार करून सदर बिबट्याला पकडून इतरत्र किंवा जंगलात हलविण्यासाठी विनंती केली.
शेतात जागरणीला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीती
सध्या रब्बी पिकांचा हंगाम असून शेतकऱ्यांच्या शेतात ज्वारी, हरभरा आदी पिके आहेत. पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र शेतात जागरणीवर जात आहेत. अशातच शेतकरी व महिलांना परिसरात बिबट्या व त्याचे पिल्लू नेहमीच दिसत असल्याने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात जावं की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
मागील आठवड्यातच बिबट्याचे विहिरीत पडलेले पिल्लू वनविभागाने सुटका करून इतरत्र हलवले आहे. एक पिल्लू आईपासून वेगळे झाल्याने कदाचित मादी बिबट्या पिल्लाच्या शोधात त्याच परिसरात फिरत असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी वडी, वाघी, हनवत, खेडा परिसरात दोन दिवस पेट्रोलिंग केली. परंतु, हा बिबट्या वन विभागाच्या हाती आला नाही. दरम्यान, काल गणेशपूर-वाघी रस्त्यावर एका वाहनचालकाला बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे आता या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्येही भीती पसरली आहे.
पिल्लाच्या शोधात मादी परिसरातच
मागील आठवड्यात बिबट्याचे साधारणतः अडीच वर्षाचे एक पिल्लू विहिरीतून सुटका करून इतरत्र हलवल्याने ते आपल्या आईपासून वेगळे झाले आहे. त्या पिल्लाला परिसरात मादीजवळ सोडणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. पिल्लू आईपासून वेगळे झाल्याने मादी बिबट्या त्याच्या शोधार्थ परिसरातच फिरत असण्याची शक्यता आहे. तसेच, पिल्लू वेगळे झाल्याने मादी बिबट्या एखादेवेळी हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी घाबरून न जाता सावध राहणे आवश्यक आहे.
वन विभागाकडून पाहणी
वाघी-गणेशपूर रस्त्यावर बिबट्या दर्शनानंतर आज (शनिवार) वनपाल गणेश घुगे व वनरक्षक कुंभकर्ण यांनी सदर रस्त्यावर जावून पाहणी केली. वाघी-धानोरा परिसरात मादी बिबट्या व त्याचे पिल्लू असून, त्याचा शोध लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन वनपाल गणेश घुगे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी घाबरण्याचे काहीच कारण नसून फक्त सावध रहावे. वनविभाग लवकरच बिबट्या व पिल्लाला ताब्यात घेईल, असेही वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.