परभणी - अगदी सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये असणाऱ्या परभणीला मागच्या नऊ दिवसांपूर्वी एका कोरोनाबाधित रुग्णाने घेरले आणि जिल्हा ऑरेंज झोनमध्ये गेला. मात्र, आता या एकमेव कोरोनाबाधिताचा दुसरा अहवाल आज शनिवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. ज्यामुळे परभणी जिल्ह्याला पुन्हा ग्रीनझोनमध्ये जाण्याची संधी आहे. अजून 24 तासांनी त्याचा आणखी एक नमुना तपासणीसाठी घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
मागच्या आठवड्यातील गुरुवारी परभणीच्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात पुणे येथून चोरट्या मार्गाने आपल्या भाऊजीला भेटण्यासाठी आलेल्या 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याची बाब उघडकीस आली आणि परभणीत खळबळ उडाली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण औद्योगिक वसाहत परिसर आणि सभोवतालच्या 29 नगर व कॉलनी सील केल्या. शिवाय परभणी महानगरपालिका आणि तीन किलोमीटर परिसरात तीन दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. त्यानंतर दोन दिवसांचा अवधी जाताच पुन्हा दोन दिवस संचारबंदी लावल्याने परभणीकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याप्रमाणेच इतर अनेक बंधने परभणीकरांना पाळावी लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यादरम्यान सदर 21 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा दुसरा स्वॅब दोन दिवसांपूर्वी तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल आज शनिवारी प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह निघाला आहे. शिवाय या तरुणाच्या संपर्कातील 9 नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कातील इतर 43 जणांचादेखील अहवाल निगेटिव्ह आला होता.
दरम्यान, सदर तरुण लवकर बरा होऊन बाहेर येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याला वेळीच संसर्गजन्य कक्षात हलविण्यात आल्याने त्याची लागण इतर कोणालाही झाली नाही. सुदैवाने परभणीत तो एकमेव कोरोनाबाधित आहे. त्यामुळे परभणी जिल्हा हा येणाऱ्या चार ते पाच दिवसांनी परत ग्रीनझोनमध्ये येण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
21 नवे रुग्ण, 25 जणांचा अहवाल प्रलंबित -
दरम्यान, परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 624 संभाव्य रुग्णांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये आज शनिवारी नव्याने 21 रुग्ण दाखल झाले असून एकूण संभाव्य रुग्णांचा आकडा 645 एवढा झाला आहे. यापैकी केवळ एक कोरोनाबाधित आहे, तर 454 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 25 अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयकडे प्रलंबित आहेत. शिवाय 18 अहवालांची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे महाविद्यालयाने कळवले आहे. याप्रमाणेच जिल्हा रुग्णालयाच्या संसर्गजन्य कक्षात 35 रुग्ण दाखल असून विलगीकरण केलेले 298 रुग्ण आहेत. यामध्ये 62 परदेशी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या 6 रुग्णांचा समावेश आहे.