परभणी - मराठवाड्याच्या जीवनरेषा असलेल्या गोदावरी व मांजरा नदी खोर्यातील 11 उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. नद्यांच्या दोन्ही बाजूने पडिक असलेल्या हजारो एकर जमिनीवर बांबू लागवड करून त्या बांबूपासून पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यात येतील, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. यासाठी बांबू उद्योगाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परभणीतील शेती सेवा ग्रुपच्या वतीने गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत पटेल यांनी संबंधित माहिती दिली आहे. याप्रसंगी शेती सेवा ग्रुपचे निमंत्रक अॅड.रमेश गोळेगावकर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुधीर बिंंदू, प्रा.किशन गंभीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
'पारंपरिक शेती ऐवजी तरुण शेतकर्यांनी नव्या वाटा चोखाळाव्यात'
पारंपरिक शेतीऐवजी तरुण शेतकर्यांनी नव्या वाटा चोखाळाव्यात,असे पटेल यांनी सुचवले. कोरोनानंतरचे जग प्रचंड बदलणार असून शेतीतूनच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. मराठवाड्यातील मांजरा व गोदावरी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणावर शेतकर्यांची जमीन पडिक आहे. त्यावर केंद्र सरकार मार्फत बांबू लागवड करून परिसरातील युवकांना बांबूवर आधारित रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तसेच परिसरातील शेतकरी व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारला एक प्रस्ताव देऊन बांबूची 1 कोटी रोपेही मागितल्याची माहिती पटेल यांनी दिली.
'प्लॅस्टिकला बांबूचा पर्याय'
घातक असलेल्या प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बांबू पुढे येत आहे. मानवाला लागणार्या प्लॅस्टिकच्या सगळ्या गोष्टी बांबूपासून तयार होत आहेत. केंद्र सरकार यासाठी शेतकर्यांना मदत करत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेचा फायदा घेऊन शेतकर्यांनी आपल्या पडिक शेतात, बांधावर ओढ्याच्या आणि नाल्याच्या कडेला बांबू लागवड करावी, यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त उत्पादन होईल व सोबतच पर्यावरण रक्षण असा दुहेरी फायदा होणार असल्याचेही पाशा पटेल म्हणाले.
'...तर ऑक्सिजनचे सिलेंडर पाठीवर घेऊन फिरावे लागेल'
सर्वच ठिकाणी वृक्षांची बेसुमार कत्तल होत असून, ऑक्सिजनसाठी यापुढे आता लोकांना पाठीवर सिलेंडर घेऊन फिरावे लागेल. आज मास्क बांधण्याची वेळ आली, उद्या तोंड झाकून फिरावे लागणार असल्याचा इशारा देखील यावेळी पाशा पटेल यांनी दिला. तसेच ऑक्सिजनची कमतरता हा सर्व जगासमोर चा प्रश्न आहे. मात्र, ऑक्सिजन तयार करण्यासाठी कुठलीही मशीन निर्माण करता येणार नाही. ऑक्सिजन केवळ झाडातून मिळणार असल्याने झाडांची लागवड करणे हा एकमेव पर्याय असल्याचे देखील पटेल म्हणाले.