परभणी - नांदेड व परभणी जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील जेष्ठ नाव असलेले गोदातीर समाचारचे संपादक डॉ. रविंद्र देवीदासराव रसाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी दुपारी परभणीच्या खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवार सकाळी 10 वाजता परभणी येथील वैकुंठधाम स्मशानभूमित अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
रविंद्र रसाळ यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1945 रोजी झाला. त्यांनी दै. गोदातीर समाचार चे 1992 ते 1981 या कालावधीत कार्यकारी संपादक म्हणून काम पाहीले. मराठी (ग्रामीण) पत्रकारितेतील डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले संपादक आहेत. एमएससी पदार्थशास्त्र पदवी त्यांनी संपादन केली होती. बी.जे. प्रथम श्रेणीत उत्तीण केले होते. महाराष्ट्र शासनाचे जाहीरातविषयक धोरण याबद्दल जिचकार समितीसमोर त्यांनी निवेदन सादर केले होते. अधिस्वीकृती समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहीले होते.
वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्यासाठी येत्या 29 डिसेंबरला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा रसाळ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.