परभणी- देशात जेव्हा-जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा-तेव्हा पोलिसांना हातात दंडुका घेऊन रस्त्यावर यावे लागते. सर्वसाधारणपणे पोलिसांची अशीच काहीशी प्रतिमा आजपर्यंत लोकांपुढे आली आहे. मात्र, याच खाकी वर्दीतील पोलिसांमध्ये माणुसकीही दडली आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणी शहरात असलेल्या संचारबंदीत बेघर आणि गोरगरीब लोकांना मोफत जेवायला घालून परभणी पोलिसांनी त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन समाजाला दिले आहे.
'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी जाहीर झाल्यानंतर पोलिसांकडून बळाचा वापर करतांनाचे अनेक व्हिडिओ आपण इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमातून दाखवण्यात आले. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी अनेक ठिकाणी नाईलाजास्तव पोलिसांकडून बळाचा वापर करावा लागला . परभणीतही पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मात्र, परभणीत पोलिसांचे आगळेवेगळे रूप देखील लोकांना पाहायला मिळत आहे. शहरातील रस्त्यांवर असलेल्या गरजू, बेघर आणि गरीब लोकांसाठी परभणी पोलिसांनी स्व:खर्चातून जेवण आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
एका उघड्या जीपला बॅनर लाऊन रेल्वे स्थानक, बस स्थानक, मुख्य रस्त्यांसह गल्ली-बोळात जाऊन देखील लाऊडस्पीकर मध्ये सूचना देत पोलीस कर्मचारी खिचडी आणि पाणी वाटप करत आहेत. विशेष म्हणजे पोलीस जेवण देण्यापूर्वी या लोकांना साबणाने हात धुण्याचे आवाहान करत आहेत. सॅनिटाईजर लावल्यानंतर त्यांना खिचडी आणि पाणी देण्यात येते. तसेच ही प्रक्रिया चालू असतांना पोलिसांकडून सोशल डिस्टनसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येताना दिसते.