परभणी – टाळेबंदी खुली होताच बंदी असलेला गुटखाही शहरात येत असल्याचे उघडकीस आले आहे. गुटख्याच्या पोत्यांनी भरलेला टेम्पो स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास पकडला. त्या टेम्पोतील तब्बल 16 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी चालकासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
टाळेबंदीनंतर सुमारे साडेचार महिन्यांनंतर जिल्ह्यातील बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. त्यातच गेल्या महिन्यात पानटपऱ्या सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे शहरात बंदी असलेला गुटखा व पानमसाला आदींची आवक वाढली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी रोड परिसरात आज पहाटे सापळा लावला.
अशी केली पोलिसांनी कारवाई
पोलीस पथकाने टेम्पोला (एमएच 13 सीयू 2602) थांबवून चालकासह त्यात बसलेल्या व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने पथकातील कर्मचार्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात 14 लाख 56 हजार रुपये किमतीचा सुगंधीत पान मसाला, 85 हजार 800 रुपयांचा जाफरानी जर्दा तसेच टेम्पो असा एकूण 31 लाख 50 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी चालक समोल दिलीपराव ढोबळे व तुकाराम हनुमंत वसके या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली आहे. दोन्ही आरोपींनी दीपक उर्फ दीपकसिंग याच्या मदतीने हा माल भरल्याचे पोलिसांना सांगितले. पूर्णा येथील सय्यद नावाच्या व्यक्तीला माल पुरविण्याचे दीपकने सांगितले, अशी दोन्ही आरोपींनी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.