परभणी - स्वातंत्र्याला ७० हून अधिक वर्षे लोटली तरी पाथरी तालुक्यातील फुलारवाडी या गावाला जोडणारा पक्का रस्ता आजपर्यंत कोणत्याही सत्ताधारी पक्षाने तयार केला नाही. याशिवाय इतर अनंत अडचणींना तोंड देणाऱ्या ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला. त्यामुळे गावातले मतदान केंद्र 'सूने' पडले आहे. गंभीर बाब म्हणजे खराब रस्त्याने जाताना अनेक वेळा गावातील गरोदर महिलांची वाटेतच प्रसुती झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
पाथरी तालुक्यापासून साधारणपणे २० किलोमीटर दूर असलेल्या फुलारवाडी येथील ग्रामस्थांनी रस्ता आणि इतर मागण्यांसाठी लोकसभा मतदानावर बहिष्काराची घोषणा केली होती. त्यानुसार सकाळी ७ वाजता मतदानासाठी आलेले कर्मचारी मतदान केंद्रावर केवळ बसून राहिले. सकाळच्या सुमारास २ मतदारांनी चुकून मतदान केले. मात्र, त्यानंतर सायंकाळी सव्वा चार वाजेपर्यंत एकही मतदार या मतदान केंद्राकडे फिरकला नाही.
याबाबत बोलताना ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला असून त्यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरसुद्धा या गावाला तालुक्याला जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. शिवाय गावांतर्गत अनेक अडचणी आहेत. रस्ता नसल्यामुळे गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आरोग्याच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात खराब रस्त्याने जाताना अनेक वेळा गावातील गरोदर महिलांची वाटेतच प्रसुती झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. एकूणच गावातील या परिस्थितीमुळे गावकऱ्यांनी आपला बहिष्कार कायम ठेवला होता.
गावाने पहिल्यांदाच पाहिली बस -
स्वातंत्र्यानंतर आज पहिल्यांदाच या गावात बस आल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. ही बस कुठले प्रवासी घेऊन आली नव्हती, तर या बसमध्ये गावासह परिसरातील इतर गावांचे मतदान साहित्य आणि कर्मचारी बसून आले होते.