परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक सोयऱ्या धायऱ्यांची केली होती. परंतु, सोयऱ्यांच्या राजकारणावर निवडून येता येत नाही, यांच्या या राजकारणामुळे बाकीचे अठरापगड जातीचे सोयरे मला येऊन जुडले आहेत, हे लक्षात ठेवा. शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या मतदारांनी मला निवडून दिले आहे, हे श्रेय त्यांचेच असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी दिली.
परभणी लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासून मताधिक्य कायम ठेवणाऱ्या संजय जाधव यांनी दुपारी ४ वाजता मतदान केंद्रावर येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने माझी प्रतिमा वाईट करण्याचा प्रयत्न केला. मुळात मी कधी कोणाला वाईट बोललो नाही. तरी देखील माझ्यावर केवळ मला बदनाम करण्याचे काम त्यांनी केले. आम्ही काय केले, शिवसेनेने काय केले, मोदींनी काय केले, हे आम्ही जनतेला दाखवून दिले आहे. तुम्ही काय केले? असा प्रश्न देखील खासदार जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात दाबण्याचा प्रयत्न झाला. आमच्या कार्यकर्त्यांना शेतातून जाऊ देत नव्हते, गळ्यातला रुमाल काढ म्हणायचे, यांच्या बापाची जहागीर आहे का? परंतु, त्यांच्या दादागिरीला मतदारांनी त्यावेळी उत्तर दिले नाही, शांत बसून बोलण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात झोपेत धोंडा घातला आहे. गुपचूप मतदान करुन राष्ट्रवादीला पाडले. शिवसेना संपणारी नाही, रक्ताचे पाट करुन सेना उभी राहिली आहे. परभणीच्या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिले. मी एकटा हा किल्ला लढवत होतो.माझे २-३ साथीदार माझ्यासोबत होते. परंतु, विरोधकांनी केलेल्या सोयऱ्याच्या राजकारणामुळे मला इतर अठरापगड जातीचे सोयरे धायरे येऊन जुडले, अशी प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली.
पक्षांतर्गत विरोधकांना 'नो कॉमेंट्स'
पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागलेल्या खासदार संजय जाधव यांनी पक्षातील विरोध करणाऱ्यांना सध्यातरी कुठलेही उत्तर दिले नाही. या प्रश्नावर त्यांनी केवळ नो कॉमेंट्स' असे उत्तर दिले. खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, भाजपचे जिल्हाप्रमुख अभय चाटे, प्रभाकर वाघीकर, हिकमत उडाण, अतुल सरोदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.