परभणी - येथील एका महाविद्यालयात झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणात त्या ठिकाणच्याच पर्यवेक्षकाने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी झाली. परंतु, या संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीसमोर संबंधित संस्थाचालक आणि शिक्षण अधिकारीच उपस्थित न राहिल्याने हे प्रकरण कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे आता औरंगाबादच्या माध्यमिक शिक्षण विभागाने या प्रकरणात पुन्हा एकदा 15 मे रोजी चौकशी समितीसमोर संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आदेश बजावल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फेब्रुवारी-मार्च 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेदरम्यान पिंगळी रोडवरील सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने संचालकांनी सर्रास सामूहिक कॉपी केल्याची तक्रार शिक्षण मंडळाकडे देण्यात आली होती. याची चौकशी नुकतीच करण्यात आली. 7 मे रोजी चौकशी समितीचे सचिव आ.भा. जाधव हे औरंगाबादहून सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयावर घडलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी आले होते. परंतु, यावेळी समितीच्या अध्यक्षा वंदना वाहूळ व सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे के.पी. कनके गैरहजर होते.
चौकशी दरम्यान यात जबाबदार आणि दोषी असलेल्या व्यक्तीच उपस्थित न राहिल्याने ही चौकशी पूर्ण झाली नव्हती. ही चौकशी पूर्ण करण्याच्या उद्देशाने चौकशी समितीचे सचिव आ.भा. जाधव यांनी संबंधितांना एका पत्राद्वारे कळविले असून 15 मे रोजी शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ यांच्या दालनात उपस्थित राहण्याचे आदेश बजावले आहेत.