परभणी - 'लॉकडाउन'काळात सुरुवातीचा एक महिना जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता; मात्र पुणे येथून चोरट्या मार्गाने परभणीत आलेला हिंगोलीचा तरुण कोरोनाबाधित निघाला आणि एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर परभणी न्यायालयात आज (मंगळवारी) या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी महेश तिवारी यांनी सदर तरुणाला 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिवाय त्याच्या 2 नातेवाईकांनादेखील 500 रुपये दंड ठोठावला आहे.
देशात 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला होता. मात्र सुमारे महिनाभरानंतर परभणीत 16 एप्रिल रोजी पहिला 24 वर्षीय कोरोनाचा रुग्ण सुंदराई नगर भागात आढळला होता. तो पुण्याच्या भोसरी भागातून परभणीत चोरट्या मार्गाने येऊन त्याच्या नातेवाईकांकडे वास्तव्य करत होता. त्यावेळी परभणी ग्रीन झोनमध्ये असल्याने हा रुग्ण आढळून येताच सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ कारवाई करत या रुग्णाला ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी पोलीस नाईक माधव धंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर कोरोनाबाधित गजानन पांचाळ या तरुणासह त्याचे परभणीतील नातेवाईक सचिन पांचाळ व मारुती पांचाळ यांच्याविरुद्धदेखील गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास विठ्ठल राठोड यांनी करून पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांच्या मार्गदर्शनाखाली परभणीच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी आज (मंगळवारी) मुख्य न्यायाधीश महेश तिवारी यांच्या न्यायालयात झाली. यावेळी न्यायाधीशांनी सरकारी पक्षातर्फे ॲड. देशमुख यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून आरोपी गजानन पांचाळ, सचिन पांचाळ व मारुती पांचाळ या तिघांनाही प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
".....म्हणून झाला होता गुन्हा दाखल"
दरम्यान, हा रुग्ण पुणे येथून परभणीत चोरट्या मार्गाने आला, त्यानंतर त्याने त्याची माहिती दडवून ठेवली. तसेच त्याच्या नातेवाईकांनीदेखील त्याचे सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्यावर संसर्ग आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. कोरोनाच्या संदर्भाने हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा होता. त्यानंतर गंगाखेड येथे एका उद्योजकाने लॉकडाऊन मध्ये आपल्या मुलाचा शाही विवाह स्वागत सोहळा आयोजित करून मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे शेकडोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या प्रकरणात पाच लाख रुपयांचा दंड आकारून उद्योजकावर गुन्हादेखील दाखल झाला आहे. आता पहिल्या गुन्ह्यात दंडात्मक कारवाई झाल्याने गंगाखेडसह अन्य प्रकरणांमध्ये काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.