परभणी - पाथरी तालुक्यातील शेतकऱयांना दुष्काळ अनुदानाचा दुसरा टप्पा त्वरीत वाटप करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. यासाठी आज मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांनी धाव घेतली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शाखा व्यवस्थापकांना याबाबत निवेदन देण्यात आले.
पाथरी तालुक्यातील शेतकऱयांसाठी दुष्काळ अनुदानाचा निधी बँकेला प्राप्त झालेला असून पहिल्या टप्याचे अनुदान वाटप बँकेच्या वतीने करण्यात आले. परंतु, अजूनही दुसऱ्या टप्प्याचे दुष्काळ अनुदान वाटप सुरू करण्यात आलेले नाही. या वर्षी तालुक्यात सर्वत्र दुष्काळ असून शेतकरी अडचणीत आहेत. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱयांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी याबरोबरच शाळा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी या रकमेचा उपयोग होऊ शकतो, अन्यथा शेतकरी खासगी कर्ज काढतात. त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱयांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचे त्वरीत वाटप सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.
अनुदान वाटप न केल्यास शेतकऱ्यांसह बँकेविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याबाबत बँक व्यवस्थापक टोनगे यांच्याशी चर्चा केली असता, 'सद्यस्थितीत निराधारांचे अनुदान वाटप सुरू आहे. या आठवड्यात हे वाटप संपल्यानंतर पुढील आठवड्यात दुष्काळ अनुदानाचा दुसरा टप्पा वाटप सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पंचायत समिती सदस्य अजय थोरे, रा. वि. काँ शहराध्यक्ष अमोल भाले, वक्ता सेल तालुकाध्यक्ष सुनिल जाधव, देवनांद्राचे उपसरपंच प्रताप टेकाळे, रा.वि.काँ तालुका उपाध्यक्ष भागेश पांचाळ, मोहन गोंगे, रायुकाँ शहराध्यक्ष खालेद शेख, राअकाँ सेलचे शहराध्यक्ष अहेमद अत्तार, माऊली काळे, गोविंद रणेर, सोपानराव सोगे उपस्थित होते.