परभणी - चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती पत्नीचा खून करणार्या पतीला परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. एम. बागल यांनी आज (शनिवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पूर्णा येथील लक्ष्मण काशीनाथ चांडाळ हा पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असे. त्यातूनच त्याने 11 ऑगस्ट 2018 रोजी गर्भवती असलेल्या पत्नी कांचनचा डोक्यात दगड घालून खून केला होता.
हेही वाचा - पत्नी व मुलीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला उत्तर प्रदेशातील मिर्जापुर येथून अटक
'12 साक्षीदारांची साक्ष नोंदवली'
या प्रकरणी, मृत कांचन हिचे मामा ज्ञानोबा काशीद यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पती लक्ष्मण चांडाळ याने तिचा खून केल्याचे म्हटले होते. त्यांच्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी या खुनाचा तपास करत लक्ष्मण चांडाळ याच्यावर न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. या प्रकरणी सरकारी पक्षाने बारा साक्षीदारांची साक्ष नोंदवली.
'जन्मठेपेसह इतर शिक्षाही'
सदर गुन्ह्यातील पुराव्याआधारे जिल्हा व सत्र न्यायाधीस सी. एम. बागल यांनी पती लक्ष्मण चांडाळ यास दोषी धरून कलम 302 अन्वये जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच, अन्य एका कलमान्वये पाच वर्षे कैद व पाचशे रुपये दंड, सहा महिने साध्या कैदेची शिक्षादेखील सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अॅड. डी. यु. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. बी. बी. घटे यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून फौजदार शिवशंकर मनाळे, कर्मचारी प्रवीण राठोड यांनी काम पाहिले.
हेही वाचा - कोल्हापूर : आसाम रायफलमध्ये भरतीसाठी मामाने भाच्याकडून उकळले सहा लाख रुपये