परभणी - विविध ठिकाणच्या मोटरसायकली चोरून त्याचे सुटे भाग करत ते भंगारवाल्यांना विकणाऱ्या चोरांचा परभणीच्या दहशतवादी विरोधी अर्थात एटीएस पथकाने पर्दाफाश केला आहे. या चोरांकडून तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी चोरट्यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे पो.उप.नि विश्वास खोले, स.पो.उप.नि चिंचाणे, भारत नलावडे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दिपक मुदिराज, दयानंद पेटकर, सुधीर काळे हे गुप्त माहितीच्या आधारे एका प्रकरणाचा तपास करीत होते. यानिमित्ताने शहरात गस्त घालत गोपनीय माहिती काढत होते. त्यावेळी त्यांना शेख इरफान शेख जलील (वय.१८ रा. हडको, परभणी) हा चोरलेल्या मोटरसायकली तोडून त्याचे सुटे भाग भंगार विक्रेत्यांना विकत असल्याची व चोरीच्या काही गाड्या त्याने त्याच्या राहत्या घरातील परिसरात लपवून ठेवेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी या आरोपीचा शोध घेवून त्यास हडको येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी चोरट्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार साजीद सिद्दिकी (वय.२२ रा.हडको) याच्यासोबत परभणी व गंगाखेड येथून अनेक दुचाकी चोरल्याची व चोरलेल्या दुचाकींचे सुटे पार्ट शेख मोईन सयद कासीम (भंगारवाला, रा.वांगी रोड, खंडोबा बाजार परीसर) यास विकल्याची कबुली दिली. तसेच अनेक दुचाकी इतरांना देखील विकल्याची कबुलीसुद्धा दिली. या आरोपींनी चोरलेल्या दुचाकीपैकी १४ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, त्यापैकी काही मोटरसायकली आरोपींच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आल्या. तर, उर्वरीत दुचाकी आरोपींनी ज्या-ज्या लोकांना विकल्या, त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या. या गाड्यांची किंमत २ लाख ३० हजार रुपये आहे. आरोपींना मुद्येमालासह नवा मोंढा ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील सर्व नागरिकांनी जुने वाहन खरेदी-विक्री करतांना खरेदीचे कागदपत्रे, वाहनाचे मॉडल, इंजिन नंबर, चेचीस नंबरची पडताळणी करूनच व्यवहार करावा. तसेच, भंगार विक्रेत्यांनी भंगार खरेदी व विक्री करणाऱ्या ग्राहकांचा नाव, पत्ता, मोबाइल, आधार नंबर, बिल, पावत्या व भंगारसाठा या संदर्भातील नोंदवहीमध्ये अद्यावत माहिती ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हेही वाचा- काँग्रेसच्या माजी खासदाराचा परभणी महापौराला घरचा आहेर, खड्ड्यांवरून धरले धारेवर