परभणी - जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात बुधवारी दाखल झालेल्या 74 वर्षीय वृद्ध महिलेचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या 24 तासांत नव्या 14 रुग्णांची भर पडली असून, 48 संभाव्य रुग्ण देखील दाखल झाले आहेत. त्यानुसार एकूण रुग्णांची संख्या 445 झाली, तर बळींची संख्या 17 एवढी झाली आहे. तसेच 210 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली असून, उर्वरित 218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुरुवारी सकाळी परभणी शहरातील जुना पेडगाव रोडवरील प्रभावती नगरातील रहिवासी महिलेचा मृत्यू झाला. त्या 74 वर्षांच्या असून, त्यांना बुधवारीच कोरोना संक्रमित कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी 6.15 मिनिटांनी त्यांना मृत्यू झाला असल्याची महिती जिल्हा प्रशासनाने दिली. तर बुधवारी देखील सकाळच्या सुमारास परभणी शहरातील एकबाल नगर येथील 65 वर्षीय आणि पूर्णा शहरातील शास्त्रीनगर जवळ राहणारे 61 वर्षे वृद्धाचा मृत्यू झाला. ज्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बळींची एकूण संख्या आता 17 झाली आहे.
संभाव्य 48 रुग्णांचे अहवाल आज प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये परभणी शहरातील जुना पेडगाव रोड येथील 53 वर्षे महिला आणि 60 वर्षीय पुरुष तर नांदखेडा रोडवरील 30 वर्षीय महिला, वैभव नगरातील 57 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, देशमुख गल्ली येथील 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. याशिवाय तालुक्यातील दैठणा येथे 32 वर्षीय महिला देखील कोरोनाबाधित आढळून आली आहे.
याप्रमाणे मानवत शहरातील मठ गल्ली भागात 31 आणि 24 वर्षीय महिलेसह 38 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळून आला आहे. तसेच मानवत शहरातील आंबेडकर नगर, कडतन गल्ली, गजानन नगर आणि पावर रूम या भागातील 20 ते 21 वर्षे वयोगटातील 4 तरुण बाधित आढळली आहेत. समाधानाची बाब म्हणजे, 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. ज्यामध्ये परभणी शहरातील जागृती कॉलनी व वड गल्ली या ठिकाणचे 3 रुग्ण असून, गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर नगर आणि ग्रामीण भागातील शास्त्रीनगर ईसाद तसेच सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान परभणी जिल्ह्यात आत्तापर्यंत 3 हजार 947 संभाव्य रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी एकूण 445 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 3 हजार 529 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह तर 125 रुग्णांचे अहवाल अनिर्णयक असून 52 जणांचे अहवाल प्रयोगशाळेने फेटाळले आहेत.