परभणी - दोन दिवसांपूर्वीच जिल्हा कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, अशात बुधवारी सेलू येथील रहिवासी असलेली 55 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. नांदेडमध्ये उपचारादरम्यान ही बाब उघडकीस आली. यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांनी सेलूत सतर्कता म्हणून दोन दिवसांची संचारबंदी लागू केली आहे.
सदर 55 वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिलला ती सेलू येथे आली होती. मात्र, दोन दिवस कुटुंबीयांसोबत राहिल्यानंतर उपचारानिमित्त ही महिला मंगळवारी नांदेडला रवाना झाली. तिथे खासगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीसाठी तिचा स्वॅब घेतला होता. त्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. यावेळी महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकारणानंतर नांदेड जिल्हा प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या कुटुंबीयांसह परभणी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागास सतर्क केले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शंकरराव देशमुख यांच्यासोबत तातडीने चर्चा केली. त्या महिलेच्या प्रकृतीचा आढावा घेतला. कुटुंबीयांशी संपर्क साधला, यानंतर महिलेच्या नातेवाईकांनादेखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.