परभणी - जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची परभणीतून इतर जिल्ह्यांमध्ये बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन उपजिल्हाधिकाऱ्यांना नियुक्ती देखील मिळाली आहे. शिवाय जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या ठिकाणी नवीन तहसीलदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे जिल्हाअंतर्गत महसूल विभागातील मोठे फेरबदल असून, यामुळे प्रलंबित कामे मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने औरंगाबाद विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. परभणीत कार्यरत सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांची बदली नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून तर उपविभागीय अधिकारी डॉ. सुचेता शिंदे यांची बदली लातूर येथे निवडणूक उपजिल्हाधिकारीपदावर करण्यात आली आहे. याप्रमाणेच परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी महेश वडदकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच जालना येथून निवृत्ती गायकवाड हे देखील परभणीच्या निवडणूक उपजिल्हाधिकारीपदावर येणार आहेत.
परभणीच्या तहसीलदारपदी संजय बिराजदार यांची नियुक्ती झाली आहे, ते नांदेड येथे कार्यरत होते. तसेच परभणीचे रहिवासी असलेले सखाराम मांडवगडे यांची कंधार येथून जिंतूरच्या तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीड येथून श्रीकांत निळे यांची पाथरी तहसीलदारपदी तर माजलगावच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांची पालम तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालम येथे कार्यरत तहसीलदार ज्योती चव्हाण यांची नांदेडला तर जिंतूरचे तहसीलदार यशस्वी शेजुळ यांची परळी येथे तहसीलदार पदावर बदली झाली आहे.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात परभणी जिल्ह्यातील महसूल विभागाचा कारभार मोठ्या प्रमाणात रेंगाळला आहे. या ठिकाणचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची व त्यांच्यासह अन्य दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आतापर्यंत कोणालाही नियुक्ती मिळाली नव्हती. त्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दोन व त्याहून अधिक खात्याचा प्रभार देण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात कामे रेंगाळली आहेत. त्यातच निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्याकडे असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी व अन्य दोन खात्यांचा कारभार थांबला आहे. त्यामुळे शासनाने परभणीच्या महसूल विभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्याचे दिसत आहे.