परभणी - गेल्या अकरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात पाठ फिरवली आहे. त्यातच तापमानात प्रचंड वाढ झाल्याने परभणीकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. याचा परिणाम आता पिकांवर देखील होऊ लागला आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची देखील शक्यता वाढली आहे.
जिल्ह्यात पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच ओढ दिली होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाने हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने खंड दिला. गेल्या ११ दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी तापमानात वाढ होऊ लागली आहे. सातत्याने ३० ते ३५ अंशा दरम्यान राहणाऱ्या तापमानामुळे नागरिकांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. उष्णतेमुळे भरपावसाळ्यात उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली आहे. उन्हापासून बचावाकरिता लोकांना डोक्यावर रुमाल आणि डोळ्यावर गॉगल घालून घराबाहेर पडावे लागत आहे.
दुपारच्या वेळी रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या मध्यात उन्हाळा आला की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाचे संतुलन बिघडले असून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये देखील वाढ झाली. परिणामी विविध दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्याचबरोबर वाढत्या उष्णतेचा परिणाम पिकांवर देखील होऊ लागला आहे.
पावसा अभावी पिकांचीही वाढ खुंटली
दरम्यान, जुलै महिन्याच्या शेवटच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले होते. त्यामुळे पिकांची वाढ होत होती. मात्र वाढत्या पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. अशा महत्वाच्या काळी पावसाने खंड दिल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जमिन कोरडी पडू लागली आहे. पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून उत्पादनात घट होण्याची भिती निर्माण झाली आहे. या बदललेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांकडून पुन्हा एकदा दुष्काळाची चिंता व्यक्त होत आहे.