परभणी - जिल्ह्यात मध्यरात्री आणखी ९ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर काल बुधवारी दिवसभरात १३ रुग्ण आढळून आले होते. ज्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल ३१२ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, एकूण रुग्णांपैकी ८ जणांचा यापूर्वी मृत्यू झाला असून, सध्य परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात १५५ जणांवर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे काल बुधवारी दिवसभरात तब्बल १८२ नवीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ ९ जणांचा अहवाल मध्यरात्री प्राप्त झाला. त्यामुळे अजून १७३ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. ज्यामुळे परभणीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सुरुवातीचे तीन महिने १०० च्या आत असलेली जिल्ह्याची रुग्ण संख्या आता जुलै महिन्याच्या केवळ पंधरा दिवसात ३०० च्या वर जाऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात १३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर मध्यरात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये परभणी शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा समावेश असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. किशोर सुरवसे यांनी बुधवारी रात्री बारा वाजता दिली.
रुग्णांमध्ये परभणी शहरातील दर्गा रोडवरील गणेश नगर या भागातील आहे. अन्य रुग्णांमध्ये तालुक्यातील दैठणा आणि इतर भागातील रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी सायंकाळी आढळलेल्या रुग्णांमध्ये परभणी शहरातील वडगल्ली येथील ५२ वर्षीय महिला, सर्फराज नगर मधील ५५ वर्षीय पुरुष, नानलपेठ येथील ५२ वर्षीय पुरुष, सिंचन नगरातील ५३ वर्षीय पुरुष तर डॉक्टर लेन भागातील खासगी हॉस्पिटल मधील ६० वर्षीय पुरुष व काद्राबाद प्लॉट भागातील ४५ वर्षीय महिलेसह गंगाखेड येथील एका ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर त्यापूर्वी दुपारी आलेल्या अहवालात परभणी शहरातील २, सेलूतील ३, तर मानवत मधील १ असे नवे ६ रुग्ण आढळून आले असल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांनी तीनशेचा आकडा ओलांडला. या रुग्णांमध्ये परभणी शहरातील दर्गा रोडवर असलेल्या गणेश नगरातील ३९ वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयातील यापूर्वी आढळून आलेल्या २७ महिले कर्मचाऱ्याचा दुसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर सेलु शहरात ३ आणि मानवत शहरात एका रुग्णांची भर पडली आहे. ज्यामध्ये मानवत शहरातील मेन रोडवर राहणाऱ्या ६७ वर्षीय महिलेसह सेलू शहरातील सर्वोदय नगरात राहणाऱ्या ३० वर्षीय महिला आणि ६० वर्षीय पुरुषासह ३ वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.
मंगळवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या अहवालात २९० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये आजच्या या २२ रुग्णांची भर पडली. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ३१२ एवढी झाली आहे. तर यापैकी १४९ जणांना आजपर्यंत कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तसेच ८ जणांचा मृत्यू झाल्याने उर्वरित १५५ रुग्णांवर आता जिल्हा रुग्णालयाच्या संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत. तर अजूनही १७३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.