परभणी - संघामुळे धारावीत कोरोना नियंत्रणात आला असेल तर तो नागपूरमध्ये का नियंत्रणात आला नाही? असा सवाल राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपा पुढे उभा केला आहे. संघामुळे वारे वाहतात, संघामुळे नदी वाहते, अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली. आज परभणीत कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. परभणीत सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज आणि महानगरपालिका आयुक्त देविदास पवार उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत मलिक यांनी भाजपा आणि स्वयंसेवक संघावर जोरदार टीकाही केली.
परभणी जिल्ह्यातील सर्व आमदारांना कोविड-19 साठी 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याची मुभा आहे. त्यानुसार त्यांच्या निधीतून परभणीत 16 रुग्णवाहिका खरेदी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची कमतरता भरून निघेल. यापुढे सर्वांनाच क्वारंन्टाईन सेंटरमध्ये राहण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या घरी स्वतंत्र खोली आणि शौचालयाची सुविधा असेल, त्यांना त्यांच्या घरीच होम-क्वारंटाईन राहता येईल मात्र, प्रशासन त्यांच्या खोलीला सील करेल. शिवाय त्या घराबाहेर फलक लावून गरज असल्यास त्या ठिकाणी सुरक्षारक्षक देखील बसवण्यात येईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात होणार्या गैरसोयीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कोरोना कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. त्या माध्यमातून जिल्हाधिकारीसुद्धा येथील सुविधांवर नियंत्रण ठेवतील. सध्या डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये परभणीतून गेलेल्या काही डॉक्टरांना आपल्या निवासी जिल्ह्यात काम करण्याची संधी उपलब्ध केली आहे. यामुळे 12 ते 14 डॉक्टर्स त्यांची इच्छा असेल तर परभणीत काम करण्यासाठी येतील. जिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जात देखील सुधारणा होणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच ठिकाणच्या कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होणार असून, गंगाखेड येथे पुढील काही आठवड्यात कापूस खरेदी पूर्ण करण्यात येईल. शेतकऱ्यांनी एखाद्या विशिष्ट कंपनीच्या युरियाची मागणी करु नये, सर्वच कंपनीचे युरिया खत हे एक समान असते. त्यामुळे विशिष्ट युरियाच्या खतासाठी गर्दी करून 'लॉकडाऊन'चे नियम तोडू नयेत', असे आवाहनही पालकमंत्री मलिक यांनी केले.
गंगाखेडच्या शाही सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकावर होणार कारवाई -
गंगाखेड येथे जिनिंग उद्योजक राधेश्याम भंडारी यांच्या मुलाचा शाही विवाह स्वागत सोहळा पार पडला. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला. या सोहळ्याला अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. याची चौकशी करण्यात येत आहे. उपस्थित राहणारा कोणीही असो, प्रत्येकावर कारवाई होईल, असा इशारा देखील पालकमंत्री मलिक यांनी दिला.