परभणी - चित्रा वाघ यांच्याबद्दल जिल्हा पदाधिकाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी होती. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या जागी आम्ही नवीन नियुक्ती देणारच होतो. कदाचित त्यांना हकालपट्टीची कल्पना आल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी केला आहे. शनिवारी परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्यांना सुरक्षित व्हायचे होते म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असावे - फौजिया खान
चित्रा वाघ यांच्या बद्दल पदाधिकाऱ्यांमधून तक्रारी वाढल्या होत्या. त्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची योग्य पद्धतीने वागत नव्हत्या. आम्हाला त्यांचे नेतृत्व योग्य वाटले नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार होती. आम्ही रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करणार होतो. त्यांना याची कल्पना आली असावी, म्हणूनच त्यांनी हा राजीनामा दिला असावा.
आमचे नेते खंबीर आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार
फौजिया खान यांनी सध्या राज्यात आयाराम-गयारामांची पद्धत सुरू झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी स्वतःलाही सत्ताधारी पक्षांकडून निरोप येत असल्याचे सांगितले. सध्या दबावतंत्र किंवा आमिष दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. परंतु, आम्ही त्या कुठल्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. आम्ही संविधानानुसार चालणारी माणसं आहोत. आमचे नेते खंबीर आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, असेही खान यांनी स्पष्ट केले.