परभणी - विधानसभेत परभणीच्या आमदारांनी शहरातील 100 युवकांचा सिमी आणि इसीसशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या आमदारांना त्या 100 युवकांची माहिती आहे. त्यामुळे त्यांनाच अटक करून 'त्या' 100 युवकांची माहिती घ्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
परभणीतील 'एमआयएम'चे उमेदवार अली खान यांच्या प्रचारार्थ दर्गा रोडवर आयोजित सभेत खासदार जलील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार असदुद्दीन ओवेसी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जी माहिती पोलीस आणि सीबीआयला नाही, ती गंभीर माहिती आमदारांकडे आहे. आमदारांना ताब्यात घेतल्यास इसीसमध्ये गेलेल्या त्या शंभर मुलांचा तपास लागू शकतो. त्यामुळे आपण सभापतींकडे त्यांच्या अटकेची मागणी केली, असे जलील यांनी सांगितले.
'एमआयएम'चे एबी फॉर्म विकणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार
काही लोकांनी 'एमआयएम'चे एबी फॉर्म आणून ते विकले आहेत. नांदेडमध्ये एकाने बनावट एबी फॉर्म तयार केला. अशा लोकांविरुद्ध नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती खासदार जलील यांनी दिली.