परभणी - परभणी-वसमत या राष्ट्रीय महामार्गावरील रहाटीजवळ झालेल्या ऑटोरिक्षाच्या ( Auto rickshaw accident in Parbhani )अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा ऑटोरिक्षा एका मोठ्या वाहनाला जाऊन धडकल्याने हा अपघात घडला. विशेष म्हणजे, आठच दिवसांपूर्वी परभणी-जिंतूर रस्त्यावर खड्डे चुकवताना 3 दुचाकीस्वाराचा ट्रकला धडकून मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे आता नागरिक चांगलाच संताप व्यक्त करताना दिसत आहे.
पूर्णा तालुक्यातील बरबडी येथील मुंजाजी शिंदे हे पत्नी पदमिनी व आठ महिन्याचा मुलगा वैभव यांच्यासह अमावस्येच्या निमित्ताने काल मंगळवारी वसमत रोडवरील श्री क्षेत्र त्रिधारा येथे देव दर्शनाकरिता निघाले होते. मात्र, रहाटीजवळ खड्डे चुकवताना त्यांच्या आँटोला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात ऑटो पलटी झाला आणि पद्मिनी शिंदे व 8 महिन्याचा वैभव शिंदे हे दोघे जागीच मरण पावले. तर मुंजाजी शिंदे हेही अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; संतप्त ग्रामस्थांचा -
या अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ शिंदे यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवले. तत्पूर्वी, या ठिकाणच्या संतप्त ग्रामस्थांनी सदर महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांविरूध्द मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
जिंतूर येथेही घडली अशीच घटना; तिघा भावंडांचा झाला मृत्यू -
राहटी प्रमाणेच जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील तीन भावंडांचा देखील असाच रस्त्यांवरील खड्डे चुकवताना अपघात झाला. यामध्ये ते तिघेही भावंडं ठार झाले. ही घटना आठ दिवसांपूर्वी म्हणजेच 24 जानेवारी रोजी घडली आहे. अभिषेक काशिनाथ म्हेत्रे (18), योगेश काशिनाथ म्हेत्रे (15) आणि रामप्रसाद विश्वनाथ म्हेत्रे (20) असे त्या भावंडांची नावे होती. जिंतूरच्या अकोली शिवारातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याच्या नादात त्यांची दुचाकी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला धडकली होती. त्यानंतर ते तिघेही ट्रकखाली चिरडून मरण पावले.
हेही वाचा - Fire at Nashik : सातपूरमध्ये कंपनीला भीषण आग, लाखोंचा माल खाक