परभणी - एकीकडे महाराष्ट्रातील मोठमोठ्या जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या घटत असताना परभणी जिल्ह्यात मात्र, रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी अर्थात गेल्या 24 तासात 785 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच 804 व्यक्तीं कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 3 दिवसांपासून नवीन बाधित होणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यात 7863 बधितांवर उपचार -
परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून, बुधवारी 785 नवीन बाधित आढळले तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 7 हजार 863 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 959 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 40 हजार 802 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 31 हजार 980 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 56 हजार 611 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 15 हजार 747 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 40 हजार 802 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1033 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात मृत्यूंची संख्या अधिक -
दरम्यान गेल्या 24 तासात 11 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 7 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक मृत्यू जिल्हा रुग्णालयात 4 तर आयटीआयच्या इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 4 मृत्यू झाले. याशिवाय स्वाती 1 तर स्पर्श या खाजगी हॉस्पिटलमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात 390 बेड शिल्लक -
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1839 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या केवळ 390 बेड रिकामे आहेत. तर 6 हजार 340 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत.
रेणुका हॉस्पिटल येथे 192 बेड रिकामे असून, जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटल मध्ये 51 बेड तर जिल्हा रुग्णालयात 3, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 36, स्वाती 10, भारत हॉस्पिटल 23, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 30, देशमुख 3, अक्षदा मंगल कार्यालय 21, सूर्या 7, प्राईम 18, मोरे 9, अनन्या 7, सामले 2, सिद्धिविनायक 3, ह्यात 5, सुरवसे मॅटर्निटी 3, पार्वती 4, देहरक्षा 13, स्पर्श हॉस्पिटल 11, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.