परभणी - रेल्वे प्रवासात मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळणाऱ्या मोबाईल चोरांच्या टोळीचा परभणी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सात आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून १ लाख ७१ हजार रुपये किंमतीचे १८ महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी १८ ते २५ वयोगटातील असून ते या चोऱ्या केवळ मौजमजेसाठी करीत होते.
परभणी रेल्वे स्टेशन आणि परिसरात मोबाईलवर बोलणाऱ्या प्रवाशांच्या हातातून मोबाईल हिसकावून पळ काढण्याचे प्रकार वारंवार घडत होते. विशेषत: रेल्वे गााडी सिग्नल जवळ आल्यानंतर रेल्वेची गती मंद होते, याचाच फायदा घेऊन रेल्वेच्या खिडकीत मोबाईलवर बोलत बसणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल हिसकावून पळून जाणे, पायी चालणार्या नागरिकांचे मोबाईल मोटारसायकलवरून येऊन हिसकावण्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून परभणी रेल्वे स्थानक परिसरात गस्त वाढवली होती. यावेळी पोलिसांच्या निगराणीत आढळलेल्या संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत ही टोळी रेल्वे स्थानक परिसरातील शंकर नगर, रेल्वे स्टेशन परिसर, आनंद नगर, विद्यापीठ परिसर आणि वसमत रोड परिसरात कार्यरत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी या भागात छापे टाकून ७ चोरट्यांना गजाआड केले. त्यांच्या चौकशीत या सर्वांनी वरील प्रकारे मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या चोऱ्या हे तरुण केवळ मौजमजेसाठी करत असल्याची बाब देखील पुढे आली आहे.
या चोरट्यांमध्ये शेख अरबाज शेख सोहेल, शेख रफिक शेख चिनु, शेख अमीर शेख हबीब, करण गौतम तरकसे, शेख आजीम शेख शब्बीर, शेख जुबेर शेख अहमद, अब्दुल अजीज अब्दुल माजित, (सर्व रा. शंकर नगर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी १८ ते २२ वयोगटातील आहेत. त्यांच्याकडून एक लाख ७१ हजार रुपये किमतीचे १८ अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले असून या आरोपींना मुद्देमालासह नवा मोंढा पोलीस ठाण्यात हजर करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, हनुमंत जकेवाड, मधुकर चट्टे, राजेश आगाशे आदींसह इतर पोलिसांच्या पथकाने केली.