परभणी - राज्यातील रासपचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी आज (सोमवार) पासून परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात प्रामुख्याने गंगाखेड येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे, ही मागणी त्यांनी लावून धरली आहे.
कुठल्याच मागण्यांची दखल नाही
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दोन दिवसांपूर्वी उड्डाणपूल आणि इतर विविध मागण्यांसाठी प्रशासनामार्फत शासनाला निवेदन देवून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, शासन आणि प्रशासन यापैकी कोणीही त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. त्यांच्या कुठल्याच मागणीचा विचार झाला नाही. परिणामी, त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारील मैदानावर आज (सोमवारी) बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
परभणीचे आमदार रत्नाकर गुट्टे बेमुदत उपोषणावर या आहेत मागण्या गंगाखेडातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक वर्षापासून रेंगाळले आहे. त्याचा परिणाम गंगाखेडातील बाजारपेठेवर होऊ लागला आहे. विशेषतः बसस्थानक परिसरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. या उड्डाणपुलाचे काम पूर्ण करावे, तसेच मुळी बंधाऱ्याचे रखडलेले कामही पूर्ण करावे, गंगाखेड मतदारसंघाअंतर्गत वीज तोडणीची मोहीम थांबवावी, 98 खेड्यांना मुख्य रस्त्याशी जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, जिल्ह्यातील शेवटपर्यंतच्या कालव्यांची दुरूस्ती करावी, धनगर टाकळी, पिंपळगाव, राणीसावरगाव ते लातूर जिल्हा रस्त्याचे काम पूर्ण करावे, आदी मागण्यांसाठी आमदार गुट्टे हे उपोषणाला बसले आहेत.
लबाड सरकारच्या विरोधात आंदोलन - आमदार गुट्टे
मागच्या अधिवेशनात वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडणार नसल्याचे जाहीर केले होते. याचे विरोधी पक्षाने देखील बाकडे वाजून स्वागत केले. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या सरकारने वीज तोडणीचे आदेश देऊन शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप आमदार गुट्टे यांनी केला आहे. तसेच 'आता पंढरपुरात निवडणूक असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार त्याठिकाणी शेतकर्यांची वीज जोडणी तोडली जाणार नसल्याच्या घोषणा करत आहेत, परंतु गंगाखेडमध्ये मात्र सर्रास वीज कपातीची मोहीम सुरू आहे. त्यामुळे अशा लबाड सरकारच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत असल्याचे' आमदार रत्नाकर गुट्टे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.