परभणी - जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे जवळपास सर्वच शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी साचले असून पीक सडले आहे. त्यामुळे केवळ अतिवृष्टीग्रस्त गावांचे पीक पंचनामे न करता सरसकट सर्व गावांतील पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांंनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
परभणीत परतीच्या पावसाने पिकांची धूळधाण केली आहे. परभणी जिल्ह्यात तब्बल 111 टक्के पाऊस झाला असून, एकट्या सप्टेंबर महिन्यात 260 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्याने काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर तसेच परभणीतील इतर विकासकामांच्या संदर्भात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी मुंबईत भेट घेतली. यावेळी 'नगर विकास विभागांतर्गत परभणी येथे नवीन अभ्यासिका केंद्र उभारण्यासाठी 7.50 कोटी रुपये, परभणी येथे नविन तारांगण व विज्ञान केंद्रासाठी 18.75 कोटी रुपये निधीची गरज असल्याचे सांगितले. तसेच परभणी येथे नवीन नाट्यगृहाचे काम सुरू झाले असून ते काम पूर्ण करण्यासाठी 21 कोटी निधीची गरज आहे. त्यासाठी आतापर्यंत 10 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. उर्वरीत 11 कोटी रुपये निधी लवकर मंजूर करण्यात यावा, अशी मागणी देखील केली. तसेच पर्यटन विभागांतर्गत परभणी येथे नवीन मत्स्यालयासाठी 19.50 कोटी रुपये निधी देण्यात यावा. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे परभणी येथे उपपरिसर (सब कॅम्पस) स्थापन करण्याचा प्रस्ताव सचिवांकडे मंंजुरीसाठी पाठवलेला आहे. या प्रस्तावास मान्यता द्यावी व उप परिसर इमारतीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असेही सांगितले. तसेच परभणी येथे मंजूर असलेल्या अल्पसंख्याक शासकीय तंत्रनिकेतनच्या बांधकामासाठी 50 कोटी रुपये निधी उपल्बध करुन द्यावा तर वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत परभणी येथे प्रस्तावीत शासकीय मेडिकल कॉलेजसाठी समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशीही मागणी यावेळी केली.
ऊर्जा विभागांतर्गत अतिरिक्त भार व लघुदाब क्षमतेने वीज पुरवठा करण्यास होत असलेल्या अडचणीचे निवारण करण्यासाठी बोरी येथे नवीन 132 केव्ही उपकेंद्र प्रस्तावीत करण्यासंबंधीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केलेला आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यांतर्गत ग्रामीण व शहरी भागांमध्ये नवीन वसाहतीमध्ये वीज वितरण वाहिन्या उभारणीकरिता 15 कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. समसापुर (ता. परभणी) येथे 33 केव्ही उपकेंद्राकरिता शासकिय गायरान जमीन उपलब्ध आहे. या ठिकाणी 33 के. व्ही मंजूर झाल्यास ग्रामीण भागातील वीजेच्या समस्या कमी करण्यास मदत होईल, असे आमदार डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सांगितले. या सर्व मुद्यांची माहिती ऐकल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी परभणीच्या विकासासाठी भरीव निधी देऊ, असे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे.