परभणी - 'भाजपला जयसिंग व धनंजयमधला जय नकोय. तसेच गोपीनाथ आणि एकनाथमधील नाथ देखील भाजपच्या नेतृत्वाला नको होता, असा आरोप सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (शनिवारी) परभणीत केला. तसेच भाजपमध्ये द्वेषाचे राजकारण सुरु आहे. त्यांना व्यक्तीचे नाही तर आमच्या नावाचे वैर आहे, असा टोला देखील मुंडे यांनी भाजपला लगावला.
परभणीतील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीचे औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते. यावेळी परभणीचे खासदार संजय जाधव, फौजिया खान, माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, आमदार सुरेश वरपुडकर, अमोल मिटकरी, बाबाजानी दुर्रानी, विक्रम काळे आदीसह तीनही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार'
पुढे मंत्री धनंजय मुंढे म्हणाले, राज्यात सध्या लोकशाहीचे उत्तम उदाहरण असलेले महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटातही महाविकास आघाडीचे सरकार उत्तम कामे करीत आहे. पदवीधर, बेरोजगार यांच्या प्रश्नावर सातत्याने सरकार चांगले निर्णय घेत आहे. आगामी काळात मेगा नोकर भरतीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांची संख्या आता वाढत आहे. कारण या पक्षात द्वेषाचे राजकारण सुरु झाले आहे.
'आमदार सतीश चव्हाण यांना मराठवाड्यातील समस्यांची जाण'
मराठवाड्याच्या मातीतील प्रश्न सातत्याने विधानभवनात मांडण्याचे काम करणाऱ्यामध्ये आमदार सतीश चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. ते सातत्याने अग्रेसर असतात. मी विरोधी पक्ष नेता असतांना सतीश चव्हाण व विक्रम काळे हे दोन आमदार सातत्याने माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे. मराठवाड्यातील समस्यांची जाण असणारा आमदार म्हणून सतीश चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे याही निवडणुकीत त्यांना पहिल्या पसंतीचे मत देवून विजयी करावे, असे आवाहन मुंढे यांनी यावेळी केले.
'भाजपमध्ये माझ्यासारख्या नेत्यांना किंमत नाही- गायकवाड'
याप्रसंगी भाजपला नुकतीच सोडचिट्टी दिलेले माजी खासदार जयसिंगराव गायकवाड बोलताना म्हणाले की, 'मी ज्या पक्षाला सोडचिट्टी दिली आहे, त्या पक्षात माझ्यासारख्या नेत्यांना किंमत नाही. काम नाही तसेच मान पण नाही. महाविकास आघाडीत माणसांना किंमत आहे, त्यामुळेच माझ्यासारखे अनेक नेते इकडे येण्याच्या मार्गावर असल्याने देखील गायकवाड म्हणाले. यावेळी खासदार संजय जाधव, फौजिया खान, आमदार विक्रम काळे, बाबाजानी दुरानी आदींनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा - पूर्व विदर्भातील सर्वात मोठ्या 'मंडई' सणावर यंदा कोरोनाचे सावट
हेही वाचा - 'येत्या काही वर्षात भारताचा वेगाने अर्थिक विकास होईल'